लोकपत डिजिटल मीडिया / नवीदिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरच्या पहलगामवरचा हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा प्रकार आहे. ज्यांनी हा हल्ला केला, त्या अतिरेक्यांना आणि या हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळणार आहे. आता दहशतवाद्यांना मातीत घालण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आतंकवाद्यांच्या ‘आकां’ची कंबर तोडल्याशिवाय राहणार नाही. अतिरिक्यांचं नामोनिशान मिटवणार असल्याचा कठोर संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी दिला.
राष्ट्रीय पंचायती राज कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘या हल्ल्यात काहींना आपला मुलगा गमावला. काहींनी आपला भाऊ गमावला. कोणी आपला जीवनसाथी गमावला. त्यातले अनेक जण देशातल्या वेगवेगळ्या भाषा बोलत होते. त्या सर्वांच्या मृत्युवर आमचा आक्रोश, दु:ख एकसारखे आहे’.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी अनेक घोषणा केल्या. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा कार्यक्रम त्यांच्या यूट्यूबवरील नरेंद्र मोदी या चॅनलवरही लाईव्ह होता. या वेळी अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे. तसेच पाकिस्तान व्याप्त काश्मीर परत घेण्याची मागणी केली.
पंतप्रधान मोदी यांचे भाषण लाईव्ह पाहणाऱ्या अनेक युजरने लिहिले, पीओके परत घ्या. अनेक वापरकर्त्यांनी लिहिले की, आम्हाला संपूर्ण पाकिस्तान हवा आहे. एका युजरने लिहिले की, पीओके परत घेणे हा पाकिस्तानसाठी योग्य उपाय आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, आम्हाला फक्त पीओके हवे आहे, दुसरे काही नाही. एका वापरकर्त्याने लिहिले की, पीओके हा एकमेव कायमचा उपाय आहे.