बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या तत्कालीन नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम अण्णा जगताप यांचं आज दि. २ मे रोजी अल्पशा आजारानं निधन झालं. पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६७ वर्षांचे होते. या वृत्तानं अहिल्यानगर शहरासह श्रीगोंदा आणि तमाम महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अरुणकाकांची ही ‘एक्झिट’ सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे.
अरुणकाका जगताप यांचं पार्थिव दुपारी २.०० वाजता सारसनगर येथे त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर ४. ०० वाजता अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तियांनी दिली. मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते.
अरुणकाकांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचं समजताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अरुणकाकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं काही दिवसांपूर्वी करण्यात आले होतं.
अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावानं परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ते व्याही होते. अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुणकाका जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.
… आणि काकांचा तथाकथित दबदबा संपला…!
सुमारे अठरा वर्षांपूर्वी अहिल्यानगरच्या (पूर्वीचं अहमदनगर) माळीवाडा भागात असलेल्या पारगल्लीत श्री विशाल वार्ता आणि काही दिवसांनी श्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी शहर प्रतिनिधी म्हणून काम करत असताना अरुणकाका जगताप यांचा जवळून संपर्क आला. गेली दोन वर्षे काकांसोबत आम्ही काम केलं. या वृत्तवाहिन्यांचे मार्गदर्शक म्हणून काकांचे मार्गदर्शन आम्ही कदापि विसरु शकणार नाही. त्यांचे विरोधक नेहमी अरुणकाका जगताप यांची नगर शहरात दहशत किंवा दबदबा असल्याचा आरोप करायचे. अर्थात काकांनी तो आरोप कधीच मनावर घेतला नाही. थोडेसे रागीट वाटत असले तरी काका मनाचे प्रचंड हळवे होते. अरुणकाका आपल्याला सोडून गेले, ही कल्पनाच मनाला पठत नाही. परंतु नियतीपुढे कोणाचे चालत नाही. एक मात्र खरंय, की त्यांच्या निधनामुळे नगर शहरातला त्यांचा तथागकथित दबदबा संपला, हे वास्तव मात्र सर्वांना स्विकारावंच लागणार आहे.
अरुणकाकांना ‘लोकपत’ डिजिटल मीडिया अँड लोकपत यूट्यूब चॅनल, (अहिल्यानगर) च्यावतीनं भावपूर्ण श्रद्धांजली…!