बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत डिजिटल न्यूज / अहिल्यानगर
वात्रटिका किंवा विडंबन काव्य सादर करणं, एखाद्या मोठ्या नेत्याच्या आवाजाची नक्कल करणं, विनोदनिर्मितीद्वारे सत्ताधाऱ्यांच्या उणीवा किंवा छोट्या मोठ्या चुका जनतेसमोर आणणं, हा खरं तर कायदेशीर गुन्हा अजिबात ठरु शकत नाही. किंबहुना तो त्या कलाकाराला घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. मात्र अशा कलाकारांच्या विषयी आकस बुद्धी ठेवून सत्तेतल्या लोकांकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत विनाकारण एखाद्याला त्रास देणं हे सत्ताधारी मंडळींना शोभत नाही. खरं तर कुणाल कामरा यानं केलेलं विडंबन ही हास्यास्पद बाब असल्याचं समजून त्याकडं दुर्लक्ष करण्याचीच खऱ्या अर्थाने गरज होती. मात्र ‘शिवसेना स्टाईल’ नडली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांच्या ‘ट्रॅप’मधे अडकले. या साऱ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला विचारावसं वाटतं, अरे तो तर कामरा. मग उगाचच कशाला त्याला घाबरा? चिखलात दगड मारुन पांढऱ्या कपड्यांवर डाग पाडून घेण्यात कसलं आलंय शहाणपण?
कुणाल कामरा याच्या विडंबन काव्याला उत्तर देण्यासाठी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेने विनाकारण चक्क दोन दिवस खर्च केले. दुसऱ्या बाजूला भाजपचा विचार जर केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट आणि तटस्थ भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे. वास्तविक पाहता कुणाल कामरा याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरदेखील टीका केली आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा ‘बखुबी’ हाताळला आणि टाळला आहे.
सत्ताधारी जी मंडळी आहेत, त्यांच्यावर कुणाल कामरा याने सहजासहजी मात केल्याचं पाहायला मिळत आहे. कामरा याने सत्ताधाऱ्यांवर नुसतीच मात केली नाही. तर त्यांच्यात भांडणंदेखील लावून देण्याचा प्रयत्न त्यानं केला आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार जे बोलले, तेच मी बोललो, अशी मखलाशीदेखील कामरा याने केली आहे. याचा अर्थ कुणाल कामरा याला महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी प्रचंड महत्व दिलं असल्याचं स्पष्ट होत आहे.
‘कर नाही त्याला डर कसली’, अशी एक म्हण आपल्याकडे सातत्याने ऐकवली जाते. या म्हणीचा शब्दशः अर्थ असा, की जर तुम्ही काही केलं नाही, तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. या म्हणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेनं वर्तन करायला हवं होतं. परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही. एकनाथराव शिंदे यांचं पित्त खवळून द्यायला विरोधकांना कुणाल कामरा हा ‘प्यादा’ गवसला. त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथराव शिंदे यांना ‘ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी झाला, असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.