लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगाव तांदळी या परिसरातून तब्बल 12 लाख रुपयांच्या विजेच्या साहित्याची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात नागार्जुन कन्स्ट्रक्शन (NCC) या ठेकेदार कंपनीनं अहिल्या नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतंच निवेदन दिलंय.
या निवेदनात म्हटलं आहे, की एनसीसी या कंपनीमार्फत अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरणच्या आरडीएस प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. दि. 14 मार्च रोजी वडगाव तांदळी परिसरातून बारा लाख रुपये किंमतीचे 62 आरजेपोल चोरीला गेल्याचं कंपनीचे साईट इन्चार्ज अभियंता लीला प्रकाश यांच्या निदर्शनात आलं. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तपासणी करुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध या संदर्भात गुन्हा दाखल करावा.
दरम्यान, एनसीसी कंपनीच्या काही विद्युत साहित्यांची छत्रपती संभाजीनगर इथं चोरी झाली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे. पारनेर पोलीस ठाण्यातदेखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी काही मुद्देमालदेखील ठेकेदार कंपनीला परत दिला आहे. मात्र नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी किंवा गुन्हा दाखल होणार, याची एनसीसी कंपनीला प्रतीक्षा आहे.