Monday, April 28, 2025

अरे, हे कसले ढोंगी शिव भक्त? शिवजयंती मिरवणुकीत डीजेच्या तालावर ढुंगणं हलवून नाचतांना या मुर्खांना लाज कशी वाटत नाही?

 विशेष संपादकीय…!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्या शिवनेरी गडावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्या गडावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डोळ्यांचं पारणे फेडणारा शिवजन्म सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं आश्वासन दिलं. राज्याच्या तीनही प्रमुखांनी छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शानं पुनित झालेल्या या शिवनेरी गडावर बराच वेळ व्यतीत केला. 

दुर्दैवाची बाब अशी, की याच पवित्र शिवनेरी किल्ल्यापासून 109 किलोमीटर अंतरावर असलेल्या अहिल्यानगर (पूर्वीचं अहमदनगर) शहरात शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांऐवजी डीजेच्या तालावर ‘नायक नही, खलनायक हूं मैं’ या गाण्याच्या तालावर तथाकथित शिवभक्त देहभान विसरुन नाचत असल्याचं पहायला मिळालं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. मनात प्रश्न उपस्थित झाले, की अरे, हे कसले ढोंगी शिव भक्त? शिवजयंती मिरवणुकीत डीजेच्या तालावर ढुंगणं हलवून नाचतांना या मुर्खांना लाज कशी वाटत नाही? ज्या गाण्यावर हे तथाकथित शिवभक्त नाचत होते, त्या ‘नायक नही खलनायक हूं मैं’ या गाण्याचा आणि शिवजयंती मिरवणुकीचा काही तरी संबंध आहे का? कधी कळणार आपल्याला छत्रपती शिवराय?

छत्रपती शिवराय आणि त्यांचे विचार हे डोक्यावर मिरविण्याची नाही तर डोक्यात घेण्याची बाब आहे. वास्तविक पाहता शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित अभ्यासकांची व्याख्यानं आयोजित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तरुण वर्गाला किंबहूना तरुण पिढीला छत्रपती शिवराय समजतील. आता हे सारं करण्याऐवजी या मिरवणुकीत स्वतःला दारु ढोसून ढुंगणं वाकडी करुन नाचता यावं, यासाठी हजारो रुपये खर्च करुन डीजे लावत नाचायची हौस भागून घ्यायची आजच्या तथाकथित शिवभक्तांना प्रचंड चुकीची आणि घाणेरडी सवय लागली, हे मोठं दुर्दैव आहे.

छत्रपती शिवरायांच्या निधनाची बातमी समजताच ज्या क्रूरकर्मा औरंगजेबानं त्याच्या ‘अल्लाह’कडे प्रार्थना केली, की शत्रूंच्या आईला आई आणि बहिणीला बहीण म्हणणारा सर्वात मोठा राजा या पृथ्वीतलावरुन तुझ्याकडे येत आहे. त्या महान शिवाजी राजासाठी तुझ्या दरबाराचे दरवाजे उघडे ठेव. कारण असा शत्रू या पृथ्वीतलावर पुन्हा होणे नाही.

छत्रपती शिवरायांना आयुष्यभर ज्या मुघलांशी युद्ध करावं लागलं, त्या मुघल साम्राज्याचा सम्राट औरंगजेब हा गुडघे टेकून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांसाठी प्रार्थना करत आहे. मात्र दुसरीकडे ज्यांना शिवराय कळालेच नाहीत, असे मूर्ख लोक डीजेच्या तालावर ढुंगणं हलवून नाचत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज की… अशी घोषणा ऐकता क्षणी आपोआपच ‘जय’, असा जयघोष येतो, त्या छत्रपती शिवरायांबद्दल आणि छत्रपती युवराज संभाजी राजांबद्दल औरंगजेब म्हणतो, ‘सिवा चला गया लेकिन, अपनी सोच जिंदा छोडकर चला गया’, त्या युवराज छत्रपती संभाजीराजांनी हिंदू धर्माचा त्याग करुन मुस्लिम धर्म स्विकारावा, यासाठी शंभूराजांचा औरंगजेबानं त्यांचा  अतोनात छळ केला, परंतू छत्रपती संभाजीराजांनी धर्मांतर केलं नाही. आजचे तरुण-तरुणी मात्र असा कुठलाच आदर्श डोक्यात न घेता काहीही चुकीचे निर्णय घेताहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकारणातल्या पुढार्‍यांनी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांचं कार्यकर्तृत्व तरुण पिढीला समजावं, यासाठी दर शिवजयंतीसह पुण्यतिथीला आणि संभाजीराजांच्या जयंतीसह पुण्यतिथीला राज्यातल्या प्रसिद्ध अशा इतिहास संशोधक आणि अभ्यासकांचं शिवचरित्रावरचं व्याख्यान आयोजित करायला हवंय. निदान यामुळे तरी शिवजयंतीच्या मिरवणुकीतली युगपुरुषाची विटंबना थांबली जाईल. तूर्तास इतकंच. धन्यवाद.

 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी