लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
शेतकरी वर्गाशी नित्यनेमाने संबंधित असलेल्या राज्य सरकारच्या भूमी अभिलेख कार्यालयातला ‘आका’ आणि त्याचे एजंट सातत्यानं सर्वसामान्यांची प्रचंड आर्थिक लूट करत आहेत. या एजंटांचा सरदार असलेला ‘आका’ मोठ्या वर्तमानपत्रातल्या जाहिरात विभागाची नोकरी सोडून या कार्यालयात ‘चिकटला’ आणि दिवसेंदिवस ढेकण्यासारखा फुगत चाललाय. या एकूणच सत्य परिस्थितीवर भूमी अभिलेखच्या प्रमुख अधिकाऱ्यांना ‘लोकपत’चं खुलं आव्हान आहे, अविनाश मिसाळ साहेब, तुमच्या कार्यालयातला ‘आका’ पहा किती फुगलाय. गोरगरिबांना लुटणाऱ्या ‘आका’चं पोट कधीही फुटेल, काळजी घ्या मिसाळ साहेब…!
भूमी अभिलेखच्या या ‘आका’ने गंगाराम नावाच्या एका बिल्डरकडून जमीन मोजणीसाठी तब्बल चार लाख रुपये उकळले असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या बिल्डरने संबंधित ‘आका’विरुद्ध तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत. मात्र ज्यांच्याकडे संबंधित बिल्डरने तक्रारी केल्या, त्यांचाच या ‘आका’ला वरदहस्त असल्याचं बोलल जात आहे. आता तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीत या कार्यालयातला ‘आका’चं गोरगरिबांचे मुंडके मोडून आर्थिकदृष्ट्या गब्बर झाल्यानंतर ढेकण्यासारखं त्याला कोणी चिरडून टाकणार नाही का?
सामान्य माणसाच्या गरजा किती असतात हो? अन्न, वस्त्र, निवारा किंवा रोटी, कपडा और मकान. या तीन गरजा पूर्ण झाल्यानंतरही प्रचंड असा संचय करण्याची मोठीच हौस अनेकांना असते. पण हा धनसंचय अनेकवेळा मृत्यूला कारणीभूत ठरल्याची प्रचंड अशी उदाहरणं आहेत. भूमी अभिलेख कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी मोजणी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या या ‘आका’चं पोट आहे की महापालिकेचं गोडाऊन? या ‘आका’चं पोट कधी भरणार, हेच समजायला मार्ग नाही.
सज्जनहो! कलेक्टरांकडे तक्रारी कराच…!
अहिल्यानगरच्या भूमी अभिलेख कार्यालयासंदर्भात अनेकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या असल्या तरी या तक्रारींना बातम्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने वाचा फोडणार आहोतच. मात्र या बातम्यांना मजबूत अशी साथ तेव्हाच मिळेल, जेव्हा हे सारे असंख्य तक्रारदार अहिल्यानगरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडतील. आतापर्यंत या कार्यालयातल्या ‘आका’ आणि त्याच्या एजंटांकडून ज्यांची ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे, त्या सर्वांनी जिल्हा प्रशासनाकडे एकदा तक्रारी कराव्यातच, असं आवाहन या बातमीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.