लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अवैध ढाबे आणि अनधिकृत हॉटेलमध्ये विनापरवाना करण्यात येणाऱ्या मद्य (दारु) विक्रीविरोधात लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार ही कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या धंद्यांवर कधीही ‘स्टेट एक्ससाईज’ अर्थात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा बुलडोझर फिरवला जाऊ शकतो. अवैध देशी आणि विदेशी दारु विक्री करणाऱ्यांना या कारवाईमुळे चांगलाच झटका बसणार आहे.
2025 मध्ये म्हणजे यावर्षी अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या धंद्यांवर कारवाई करण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी आदेश दिले आहेत. अवैध धाबे आणि अनधिकृत हॉटेलमध्ये केल्या जाणाऱ्या अवैध देशी आणि विदेशी दारू विक्रीमुळे शासनाच्या महसुली उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असून अशा ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं या लेखी आदेशात म्हटलं आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल परवानाधारकांशी (एफ एल ३) सातत्यानं संपर्कात राहून परवानाधारकांच्या परिसरात होत असलेल्या अवैध ढाबे आणि अनधिकृत हॉटेल्समधून विक्री होत असलेल्या देशी आणि विदेशी दारुच्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आणि लेखी आदेश राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबईच्या आयुक्तांनी दिले आहेत.
जाणीवपूर्वक कायदेशीर व्यवसाय करण्याचे टाळणाऱ्यांना आणि अधिकृतपणे मद्य विक्री करणाऱ्या, विक्री करण्याच्या उद्देशाने देशी विदेशी मद्य बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्यांसह अनधिकृत हॉटेल मालकांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य दारूबंदी अधिनियम कलम ६५, ६८ आणि ८४ नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, असा स्पष्ट आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.