लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, अशी एक म्हण आपल्याकडे प्रचंड प्रसिद्ध आहे. दैनंदिन व्यवहारात या म्हणीचा प्रत्यय यापूर्वी अनेकांना आलेला आहेच. राजकीय क्षेत्रातसुद्धा हा प्रत्यय येत आहे. अहिल्यानगरच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (उबाठा) मोठे भगदाड पडलं असून ठाकरे गटाच्या 15 माजी नगरसेवकांसह अनेक शिवसैनिकांनी ठाकरे गटाची साथ सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. या सर्वांचा उद्या (दि. 30) मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान जाहीर प्रवेश होणार आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी नगरसेवक सुरेश तिवारी, माजी नगरसेवक संतोष गेनप्पा, माजी नगरसेवक नळकांडे अशा अनेकांचा समावेश आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रचंड ‘गडबडी’ होणार आहेत. त्यातलीच ही एक ‘गडबड’ असल्याचं सध्या बोललं जात आहे.
मुंबईत होणाऱ्या या प्रवेश सोहळ्यासाठी अनेक माजी नगरसेवक आणि शिवसैनिक भल्या पहाटे मुंबईकडे रवाना होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्वांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश होणार आहे. या राजकीय प्रवेश सोहळ्यानंतर अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार आहे. अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचा शिंदे गट हा राजकीयदृष्ट्या प्रबळ ठरणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निष्प्रभ ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, अहिल्यानगरच्या अनेक माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश होणार, अशी चर्चा फार पूर्वीपासून ऐकायला मिळत होती. मात्र प्रत्यक्षात ती चर्चा उद्या (दि. 30) खरी ठरणार असल्याची चिन्हे आहेत.