बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या महापालिकेत हल्ली वरच्या वर वेगवेगळ्या प्रकारचे ‘जादूचे प्रयोग’ पहायला मिळत आहेत. मात्र या प्रयोगांमुळे सामान्य नगरकरांचं मनोरंजन होण्याऐवजी नगरकरांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जात आहे. अशीच एक संतापजनक ‘जादू’ अहिल्यानगर महापालिकेत सध्या पाहायला मिळत आहे. या महापालिकेत काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी ‘आशिष’ नावाचा एक खासगी इसम ठेकेदारांच्या संगनमतानं ‘अर्थपूर्ण’ गडबड करायचा. मात्र या ‘आशिष’च्या जागेवर आता ‘अश्विन’ आलाय. खासगी इसम असलेला हा ‘अश्विन’ अहिल्यानगर शहर आणि परिसरातल्या डॉक्टरांसोबत ‘अर्थपूर्ण’ गडबड करत असल्याची जोरदार चर्चा महापालिका कार्यालय परिसरात सुरु आहे.
अशा प्रकारच्या आर्थिक ‘गडबडीं’ची दखल घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कार्यरत असला तरी अहिल्यानगरच्या लोकांचा नगर, नाशिक, बीडच्या एसीबीवर विश्वास नाही म्हणून की काय, काही महिन्यांपूर्वी अहिल्यानगर महापालिकेत छापा टाकण्यासाठी मुंबई एसीबीला बोलविण्यात आलं होतं. त्यानंतर यापूर्वीच्या आयुक्तांवर जी कारवाई झाली, ती सर्वश्रृत आहेच. म्हणूनच नगरकर पुन्हा एकदा ‘मुंबई ‘एसीबी’च्या ‘साहेबां’नो, उघडा डोळे बघा नीट’, अशी अप्रत्यक्षपणे हाक देत आहेत.
कोण आहे हा ‘अश्विन’…?
खासगी इसम असलेला हा ‘अश्विन’ महापालिकेत विनाकारण लुडबूड करत आहे. अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचं दाखवत ठेकेदार मंडळींकडून ‘मलिदा’ लाटण्याचं काम करता यावं, यासाठी खासगी इसम असलेला हा ‘अश्विन’ आयुक्तांच्या केबिनसमोरच सतत घुटमळत असतो. ‘मांडवली बाश्शा’ अशी या ‘अश्विन’ची ख्याती आहे म्हणे. शहर आणि परिसरातल्या बहुतांश डॉक्टर मंडळींच्या अनेक प्रकरणांत हा ‘अश्विन’ ‘मांडवली बाश्शा’ची भूमिका अतिशय प्रभावीपणे पार पाडत आहे, हे विशेष…!
… तर अहिल्यानगर महापालिकेत पुन्हा एकदा ‘तोच’ प्रयोग…!
अहिल्यानगर महापालिकेत यापूर्वी मुंबई एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जो छापा टाकला, त्यासाठी बांधकाम क्षेत्रातल्या काहींनी एसीबीच्या वरिष्ठांकडे गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र यावेळी वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी यासाठी पुढाकार घेण्याच्या विचारात असून या महापालिकेत पुन्हा एकदा मुंबई एसीबीचा ‘तोच’ प्रयोग होणार असल्याचं बोललं जातंय.
या ‘अश्विन’चं मोबाईल लोकेशन तपासा…!
महापालिकेत कुठलंच काम नसताना किंबहूना अहिल्यानगर महापालिकेत साध्या कंत्राटी कामगार या पदावरसुद्धा कार्यरत नसताना आणि अहिल्यानगर महापालिकेशी काहीही संबंध नसतानाही ‘हा’ ‘अश्विन’ याठिकाणी महापालिकेचा जबाबदार अधिकारी असल्याच्या अविर्भावात फिरत असतो. या ‘अश्विन’च्या ‘गडबडी’ चव्हाट्यावर आणण्यासाठी त्याचं ‘मोबाईल लोकेशन’, ‘सीडीआर’ आणि ‘व्हाट्सअप कॉल डिटेल्स’ तपासण्याची अत्यंत आवश्यकता आहे.