लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावात ज्या पद्धतीने ‘मोठा आका’ आणि ‘छोटा आका’ने धुडगूस घातलाय, अगदी तशाच पद्धतीनं अहिल्यानगर तालुक्यातल्या बाबुर्डी बेंद परिसरातल्या गट नंबर 22 मध्ये नगर तहसील कार्यालयातल्या लोकांना हाताशी धरुन खडकी गावातल्या सुरज भाऊसाहेब कोठुळे याने अनधिकृतपणे मुरुमाचं उत्खनन करुन हजारो टिप्पर मुरुम चोरी केल्याचा आरोप नगर तालुक्यातल्या बाबुर्डी बेंद गावच्या अमोल भाऊसाहेब चोभे या तक्रारदारानं केला आहे. हे करत असताना नगर तहसील कार्यालयातल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी कोठूळे याने ‘अर्थपूर्ण’ तडजोड केली असल्याचंही चोभे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
नगर तहसील कार्यालयानं या संदर्भात जो पंचनामा केला आहे, त्या पंचनामेच्या नकला मिळाव्यात आणि मुरुमाची चोरी करणाऱ्या कोठूळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी चोभे यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास दिनांक एक मार्च रोजी बाबुर्डी बेंद गावातल्या गट नंबर 22 मध्ये कुठलीही पूर्व सूचना न देता आत्मदहन करण्याचा इशारा अमोल चोभे यांनी दिला आहे.
या आत्मदहन आंदोलनानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल, त्या परिस्थितीला अहिल्यानगर तहसील कार्यालय जबाबदार राहील, असंदेखील चोभे यांनी म्हटलं आहे.