लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगरमध्ये श्रीरामनवमीची मिरवणूक दुपारी चारनंतर सुरु होणार आहे. खरंतर ही मिरवणूक अशा टॉकीजमार्गे नेण्याचा निर्धार होता. परंतु अहिल्या नगरच्या पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवल्यानं आणि पंचपीर चावडी ते आशा टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी पत्रे ठोकून बॅरिकेटिंग केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचा नाविलाज झाला. अखेर पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार बॉम्बे बेकरी, चांद सुलताना शाळेजवळून श्रीराम नवमीची मिरवणूक जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत अहिल्यानगरच्या पोलिसांनी पहिल्यांदाच एस एल आर शॉटगनसारख्या शस्त्रांचा साठा मागवला. दुपारी चार नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करून श्रीराम नवमीची मिरवणूक सुरू होणार आहे. या मिरवणुकीमध्ये सकल हिंदू समाज, हिंदू राष्ट्र सेना, वास्तव कंपनी ग्रुप, श्रीराम सेना अशा चार संघटनांचा समावेश आहे.
पोलिसांनी श्रीरामनवमी मिरवणूक मार्गावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, बॉम्बे बेकरी, चांद सुलताना स्कूल, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ असा केला आहे.
श्रीरामनवमी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या पोलिसांनी तब्बल 222 जणांना शहरातून हद्दपार करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. तोफखाना पोलीस ठाणे 88, कोतवाली 74, तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी 60 जणांना नोटीसा बजावल्या आहेत.
का होता पोलिसांचा ‘हा’ आग्रह?
अहिल्या नगर शहरात शिवजयंती आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक दरवर्षी आशा टॉकीजमार्गेच नेली जाते. 2015 पर्यंत रामनवमीची मिरवणूकदेखील याच मार्गाने नेली जात होती. मात्र त्यावेळी आशा टॉकीज चौक परिसरात दगडफेक झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तोच मुद्दा पुढे धरुन श्रीराम नवमीची मिरवणूक आशा टॉकीजमार्गे न नेण्याचा आग्रह पोलिसांनी धरला आहे.