लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या भूमि अभिलेख (सिटी सर्वे) कार्यालयातली महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी गेल्या वर्षी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या वर्षभराच्या कालखंडामध्ये तपासकार्यात काहीच प्रगती नाही. दुसऱ्या बाजूला या कार्यालयाच्या वरिष्ठांनी कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी अद्यापपर्यंत कुठलीही चौकशी समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत नाही. अहिल्यानगर महापालिकेने जसं त्रिसदस्यीय समितीची स्थापना करून तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगेंविरुद्ध कठोर कारवाई केली गेली, त्याप्रमाणे अहिल्यानगर सिटी सर्वे कार्यालयाच्या वरिष्ठांनी असं काही तरी करणं अपेक्षित होतं. मात्र दुर्दैवानं तसं झालं नाही.
अशा परिस्थितीत या कार्यालयाविषयी काही प्रश्न नगरकरांच्या मनात उपस्थित झाले आहेत. यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, की अहिल्यानगर ‘भूमी अभिलेख’च्या ‘त्या’ कागदपत्रांच्या संदर्भात या जन्मात तरी त्रिसदस्यीय समिती स्थापन होणार का?
या कार्यालयाच्या परिसरात ‘अर्थपूर्ण’ वावरणाऱ्या अनेक एजंट मंडळींचे ‘सी डी आर’, ‘ऑनलाईन ट्रांजेक्शन’ हे सारं तपासण्याची नितांत आवश्यकता आहे. गोरगरिबांच्या कष्टाच्या पैशांतून आर्थिकदृष्ट्या ‘गब्दुल’ झालेल्या या एजंट मंडळींमध्ये नेवाशाचा एक ‘गब्दुल’ लोकांना खोटंच सांगतो आहे, की ‘सारं काही आम्ही ‘मॅनेज’ केलं असून संबंधितांना ‘पाकीट’ पोहोचलं आहे. त्यामुळे सिटी सर्वे संदर्भात बातम्या येणार नाहीत’. पण त्या ‘गब्दुल’ला हे माहीत नाही, की अहिल्यानगरचे पत्रकार ‘पाकीट संस्कृती’ला अजिबात भीक घालत नाहीत.
यानिमित्तानं आम्हाला एकच सांगायचं आहे, की मिसाळ साहेब, तुमच्या अवतीभवती फिरणाऱ्या या ‘गब्दुल’चं थोबाड बंद करा. अन्यथा ‘गब्दुल’सह कोणीही आलं तरी कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरुद्ध नावासह रितसर तक्रार देण्यात येईल.
… तर ‘एसीबी’ला ५१ हजारांचं बक्षीस…!
अहिल्यानगर सिटी सर्वे कार्यालयातल्या कथित भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्याची जबाबदारी खरं तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (अँटी करप्शन ब्युरो) आहे. मात्र या कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अहिल्यानगर सिटी सर्वे कार्यालयातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणं अजिबात शक्य होणार नाही, असंच दिसतंय. या अधिकाऱ्यांनी सिटी सर्वे कार्यालयातल्या भ्रष्टाचारावर जर कारवाई केली, तर पीडित लोकांकडे भीक मागून एसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ५१ हजार रुपयांचं बक्षीस देण्यासाठी आम्ही स्वतः (लोकपत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर) पुढाकार घेऊ.
पिडितांनो! ऐनवेळी ‘शेपूट’ घालणं बंद करा…!
अहिल्यानगर सिटी सर्वे कार्यालयातल्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात अलीकडे बातम्या येत नाहीत. त्यामुळे खरंच ‘सेटलमेंट’ झाली की काय, अशी शंका उपस्थित होणं, स्वाभाविक आहे. परंतू या कार्यालयात ज्यांना ज्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास झाला आहे, त्यापैकी सर्वच तक्रारदारांनी आमच्याकडे एक अट ठेवलीय, की ‘आमची बातमी छापा. पण आपण आमचं नाव बातमीत छापू नका. कारण आम्हाला पुढे त्रास होईल. आमचं काम होणार नाही’.
तक्रारदारांच्या अशा ऐनवेळी शेपूट घालण्याच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत. तक्रारदारांची अशी अट असतानादेखील आम्ही कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता तब्बल सात बातम्या प्रसारित केल्या. दुसरं कोणीही हे का करत नाही, आम्हीच हा ठेका घेतला आहे का, याचा विचार करुन दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे शिकार करु पाहत आहेत, अशा तक्रारदारांनी किंवा पिडितांनी ऐनवेळी ‘शेपूट’ घालणं बंद करावं, असं जाहीर आवाहन आम्ही करत आहोत.