लोकपत डिजिटल न्यूज / अहिल्यानगर
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातले भाडे तत्वावर दिलेले गाळे, हॉल, शाळा वर्ग खोल्या, मोकळ्या जागाधारक, भाडेकरु यांच्याकडे असलेली थकबाकी निर्लेखित करण्याचा अधिकार या महानगरपालिकेच्या महासभा, स्थायी सभा, आयुक्त किंवा प्रशासक यांना नाही, असं स्पष्टीकरण देत अहिल्यानगर शहरातले रवी वखारे (मोबाईल नंबर +91 98509 09783) यांनी राज्याच्या नगर विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
वखारे यांनी या निवेदनात म्हटलं आहे, की अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह या महापालिकेचे प्रभारी कर उपायुक्त प्रियंका शिंदे, प्रभारी नगरसचिव मेहेर लहारे, प्रभारी मार्केट विभाग प्रमुख एस. एस. पुंड, मार्केट लिपिक व्ही. व्ही. माने, बिगारी या पदावर काम करणारे एस. जी. दुबे या सर्वांनी अधिकार नसतानासुद्धा अहिल्यानगर शहरातल्या छाया टॉकीजच्या व्यापारी संकुलात असलेल्या पहिल्या मजल्यावरच्या डॉ. अजित बोरा यांच्याकडे असलेल्या हॉलचं दहा लाख बारा हजार 940 रुपये भाडं निर्लेखित करून महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केलं आहे. महापालिकेला घरपट्टी आणि पाणीपट्टी निर्लेखित करण्याचा अधिकार असला तरी हॉलचं भाडं निर्लेखित करण्याचा अधिकार नाही, असा दावा वखारे यांनी या निवेदनाद्वारे केला आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीचे आयुक्त डॉ. पंकज जावळे
यांनीदेखील सदर हॉलचं भाडं निर्लेखित करण्याच्या संदर्भातल्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. अहिल्यानगर महापालिकेचे सध्याचे आयुक्त आणि प्रशासक यशवंत डांगे यांनी मात्र या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याने वखारे यांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, सदरची रक्कम कोणत्या नियमाप्रमाणे आणि कलमानुसार निर्लेखित करण्यात येते, असा गंभीर मुद्दा वखारे यांनी उपस्थित केला आहे. बोरा यांच्याकडे असलेली एक लाख 40 हजार रुपये या हॉलची घरपट्टीही अहिल्यानगर महापालिकेने भरून घेतलेली नाही, असंही वखारे यांनी या निवेदनात म्हटलं आहे. राज्याचे नगर विकास मंत्रालय या संदर्भात संबंधितांविरुद्ध काय कारवाई करणार, याकडे मात्र तमाम नगरकरांच्या नजरा लागल्या आहेत.