लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरातले ४१ ओढे आणि नाले गायब झाल्याच्या वस्तुस्थितीबद्दल वारंवार भाष्य करणारे आणि १५ मे पूर्वी हे ओढे – नाले साफ करण्यात आलेत की नाही, याबद्दल अहिल्यानगरच्या महापालिका प्रशासनाला सातत्याने जाब विचारणारे ७७ वर्षीय ‘अँग्री ओल्ड मॅन’ शशिकांत चंगेडे महापालिका कार्यालयात आज (दि. १९) दुपारी तीन वाजता उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र चंगेडे यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याला अहिल्यानगर महापालिका प्रशासन घाबरलंय. या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे ए. के. बल्लाळ यांनी चंगेडे यांना शुक्रवारी पत्र पाठवत उपोषण करु नका, अशी विनवणी केली.
वास्तविक पाहता चंगेडे यांनी दि. ९ आणि १३ मे रोजी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासह महापालिकेला ईमेल केला होता.
यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्याची चंगेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये सूचना केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला त्या संदर्भात आदेश देण्यात आला. त्यानुसार महापालिकेनं चंगेडे यांना लवकरच बैठक घेण्यासंदर्भात आश्वासित केलं आहे.
… तरीही चंगेडे असमाधानीच…! आठ दिवसांनंतर महापालिकेला जाब विचारणार…!
अहिल्यानगर महापालिका प्रशासनाने या शहर आणि परिसरातल्या ४१ ओढे आणि नाल्यांच्या साफसफाई संदर्भात कितीही कागदी घोडे नाचवले तरी शशिकांत चंगेडे यांचे यामुळे अजिबात समाधान झालेलं नाही. यासंदर्भात चंगेडे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ‘अहिल्यानगर महापालिकेने जर खरोखरच ४१ ओढे आणि नाल्यांची साफसफाई केली असेल तर त्या ठिकाणचा गाळ कुठे टाकण्यात आला, याचं उत्तर द्यावं. या मोहिमेसंदर्भातले फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण मला अपेक्षित आहे. माझ्या एकट्याच्या समाधानासाठी नाही तर नगरकरांच्या जीवन मरणाचा विचार करून महापालिका प्रशासनाने प्रामाणिकपणे काम करावं. मात्र परिस्थिती गंभीर आहे. ४१ ओढे आणि नाल्यांपैकी अनेक ठिकाणच्या ओढे आणि नाल्यांत कर्मचारी उतरु शकत नाही. तिथं मशिनरी कशा जाणार? गाळ काढण्यासाठी केंद्राकडून आलेला ५५ ते ६० लाख रुपयांचा निधी नक्की कुठे खर्च झाला, याचा जाब आठ दिवसांनंतर अहिल्यानगर महापालिकेला आम्ही विचारणार आहोत’.