लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर हद्दीतल्या तारकपूर परिसरात गेल्या तीन वर्षांपूर्वी एका रस्त्याचं काम सुरु करण्यात आलं होतं. तारकपूर ते गंगा उद्यान या रस्त्याचं काम तीन वर्षातही पूर्ण झालं नाही. विशेष म्हणजे या रस्त्याचं काम पूर्ण झालं नसतानादेखील 81 लाख 95 हजार रुपयांचं बील संबंधित ठेकेदाराच्या घशात घालण्यात आलं आहे. एका अर्थाने अहिल्यानगर महापालिकेने नगरकरांच्या स्वप्नांचा अक्षरशः खून केला आहे. संबंधित ठेकेदाराला पायघड्या घालत या महापालिकेने जनतेच्या पैशांवर डल्ला मारलाय, अशी चर्चा खासगीत सुरु आहे. दरम्यान, अहिल्यानगर महापालिका प्रशासन संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
तारकपूर ते गंगा उद्यान या रस्त्याचं काम दीड वर्षापासून ठप्प पडलं असून महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला फक्त नोटिसा बजावत कागदी घोडे नाचवले आहेत. दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी या रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. या रस्ता कामांतर्गत डांबरीकरण आणि मिस्किन मळा इथं पुलाचं काम करण्याचं प्रस्तावित होतं. संबंधित ठेकेदारानं फक्त रस्त्याचं काम केलं असून पुलाचं काम मात्र केलेलं नाही. नगरकरांच्या दुर्दैवानं या रस्त्याचं काम पूर्ण होण्याआधीच हा रस्ता उखडला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर नगरकरांच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते असे, की तारकपूर ते गंगा उद्यान या रस्त्याचं काम पूर्ण होण्याआधीच संबंधित ठेकेदाराला बील का देण्यात आलं? मिस्किन मळा इथल्या पुलाचे काम का रखडलंय? या ठेकेदारावर महापालिकेने काय कारवाई केली? अहिल्यानगर महापालिकेत असलेल्या प्रशासक आणि आयुक्तांचं या भ्रष्टाचाराकडे लक्ष आहे का?
आव जाव घर तुम्हारा…!
अहिल्यानगर महापालिकेत सध्या प्रशासक राज आहे. प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराबद्दल आवाज उठवायला या महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक असे दोघेही नाहीत. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदार एकमेकांच्या हातात हात घालून अहिल्यानगरचे नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून जमा झालेल्या संकलित कराच्या रकमेसह केंद्र आणि राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीची उधळपट्टी करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या अहिल्यानगर महापालिकेत सुरु आहे. प्रशासनाची ‘मर्जी संभाळणाऱ्या’ ठेकेदारांसाठी तर ‘आव जाव घर तुम्हारा’ असं चित्र या महापालिकेत पाहायला मिळत आहे.