लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
सरकारी तिजोरीतला पैसा स्वतःच्या बँक खात्यात वळविण्याची शक्कल लढवणाऱ्या अहिल्यानगर महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे आणि विजय रणदिवे यांना कोतवाली पोलिसांनी अटक केल्यानंतर या दोघांना पहिले नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी या दोघांना कोर्टानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नगरकरांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या संकलित करामुळे राज्य शासनाकडून अहिल्यानगर महापालिकेला दरवर्षी मोठा निधी दिला जातो. आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा आदी विभागांसाठी हा निधी देण्यात येतो. मात्र आलेला हा निधी स्वतःच्या मालकीचा असल्याच्या थाटात अहिल्यानगर महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी वैयक्तिक बँक खात्यात हा निधी वर्ग केला होता. विजय रणदिवे आणि डॉक्टर बोरगे यांनी लढवलेली ही शक्कल नक्की कशी होती, याचा तपास कोतवाली पोलीस आता करत आहेत.
डॉक्टर बोरगे यांची हिंमत कशी आणि कोणामुळे वाढली?
अहिल्यानगर महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्याविरुद्ध यापूर्वी दोन ते तीन वेळा गंभीर स्वरुपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याच वेळी जर कठोर कारवाई करण्यात आली असती तर कदाचित डॉक्टर बोरगे यांच्या कामकाजात सुधारणा झाली असती. मात्र डॉक्टर बोरगे यांना कोणी तरी पाठीशी घातलं आणि भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना सारं रान मोकळं झालं. सरकारी पैसा वैयक्तिक बँक खात्यात वळविण्याची डॉक्टर बोरगे यांची हिंमत नक्की कशी आणि कोणामुळे वाढली, यामागे कोणाचा वरदहस्त आहे, खरं तर हेच तपासण्याची आता जास्तीत जास्त आवश्यकता आहे.
नगरकरांनो, आता तरी जागे व्हा…!
अहिल्यानगर महापालिकेच्या विविध विभागांच्या मार्फत नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी नगरकारांकडून विविध प्रकारचा संकलित कर गोळा केला जातो. नगरची जनता हे विविध प्रकारचे कर भरत असते. मात्र नगरकरांच्या कष्टाच्या पैशांवर जर अशाप्रकारे डल्ला मारला जात असेल तर अहिल्यानगर शहरातले सामाजिक कार्यकर्ते, जागरुक नागरिक, या शहराविषयी तळमळ असलेले या महापालिकेचे माजी पदाधिकारी हे सारे नक्की काय करताहेत? यासाठी आता सामान्य नगरकरांनीच जागं होण्याची आवश्यकता आहे. या महापालिकेत नक्की चाललंय काय, हे पाहण्याची तसदी नगरकर घेतील का, प्रशासनाला वेळोवेळी विचारतील का, हाच खरा प्रश्न आहे.