बाळासाहेब शेटे पाटील
मोबाईल नंबर : ७०२८३५१७४७
लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
ठेकेदारीचा गोचीड लागलेली अहिल्यानगरची महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून जी तडफड करतेय, ती तडफड उघड्या डोळ्यांनी पाहत बसण्याशिवाय नगरच्या जनतेला सध्या तरी दुसरा तगडा पर्याय उपलब्ध नाही, असंच काहीसं चित्र पहायला मिळत आहे. या महापालिकेत ठेकेदारांच्या टोळक्यात ‘सोबर’ आणि वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी ठरलेला ‘अश्विन’ नावाचा एक तरुण अहिल्यानगरच्या महापालिकेत चांगलीच लुडबूड करतो आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही जाहीरपणे आव्हान करत आहोत, की महापालिका ‘बीट’ पाहणाऱ्या पत्रकारांनो, नगरकरांसमोर या ‘अश्विन’सह त्याच्या पाठीराख्यांची कुंडली बाहेर काढाच.
अहिल्यानगरसह राज्यातल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखडल्या असल्यानं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवकांऐवजी ‘अधिकारी राज’ पहायला मिळत आहे. या अधिकाऱ्यांना ठेकेदारांच्या ‘सहकार्या’शिवाय गत्यंतर राहिलेलं नाही.
याठिकाणी पूर्वी नगरपालिका असल्यापासून आतापर्यंतच्या महापालिकेपर्यंतचा कारभार जर का पाहिला तर यामध्ये ठेकेदारांना अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आमच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगरच्या महापालिकेच्या कामकाजात ठेकेदार असलेल्या या ‘अश्विन’शिवाय पानही हलत नाही. कोणती बातमी द्यायची, कोणती द्यायची नाही, या निर्णयापासून तर महापालिका बीट पाहणाऱ्या पत्रकारांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारीसुध्दा हा ‘अश्विन’ बिनबोभाटपणे पार पाडतो आहे.
‘साहेब’, ठेकेदारांच्या गराड्यातून बाहेर या आणि गायब झालेल्या ओढे-नाल्यांचा विचार करा..!
नगर शहर आणि परिसरातले ४१ ओढे नाले गायब झाले असून हा गंभीर मुद्दा हाती घेऊन सत्तरी ओलांडलेले शशिकांत चंगेडे अविरतपणे एकाकी संघर्ष करत आहेत. वास्तविक पाहता तमाम नगरकरांची त्यांना खंबीर साथ मिळायला हवीय. पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही. खरं तर ज्यांच्या हाती अहिल्यानगर महापालिकेचा कारभार सोपविण्यात आला आहे, त्या सर्वच्या सर्व अधिकाऱ्यांना या बातमीच्या माध्यमातून आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो, की साहेब, ठेकेदारांच्या गराड्यातून बाहेर या आणि गायब झालेल्या ओढे-नाल्यांचा विचार करा. अन्यथा आगामी पावसाळ्यात नगरच्या अनेक भागात अतिवृष्टीचं भयंकर चित्र पहायला मिळेल.
… तर चंगेडे काका सोमवारी करणार ठिय्या आंदोलन…!
नगर शहर आणि परिसरातल्या गायब झालेल्या ४१ ओढे – नाले या मुद्द्यावर एकाकी संघर्ष करत असलेले शशिकांत काका चंगेडे यांनी अहिल्यानगर महापालिकेच्या कार्यालयात यासंदर्भातल्या विशिष्ट कागदपत्रांची मागणी केली आहे. मात्र अद्यापही त्यांना ती मिळालेली नाहीत. जर ही कागदपत्रं मिळाली नाहीत आणि ओढे नाले गायब होण्याच्या या गंभीर परिस्थितीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही तर येत्या सोमवारी (दि. २४) सत्तरी पार केलेले शशिकांत चंगेडे हे आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार आहेत, अशी माहिती स्वतः चंगेडे यांनीच ‘लोकपत’शी बोलताना दिलीय.