लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरातल्या पुणे बसस्थानकासमोरच्या गांजा डेपो परिसरात सिटी सर्वेचं कार्यालय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यालयातली महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाली आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात या कार्यालयाच्या महिला अधिकारी मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या कार्यालयातले वरिष्ठ अधिकारी असलेले अविनाश मिसाळ
हे पोलीस तपासावरच थांबले आहेत.
दरम्यान, ज्या अधिकाऱ्यांची हे कागदपत्रं सांभाळण्याची जबाबदारी होती, त्या अधिकाऱ्यांविरुद्ध आतापर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. मिसाळ हे आणखी किती दिवस हातावर हात धरून बसणार आहेत? अहिल्यानगर सिटी सर्वेच्या कार्यालयातल्या कागदपत्रांना कसे पाय फुटले? या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई का करण्यात आली नाही? मिसाळ यांची काहीच जबाबदारी नाही का? मिसाळ यांना त्यांच्या कार्यालयातली कागदपत्रं गहाळ झाल्याबद्दल काहीच कसं वाटत नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.
यासंदर्भात मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं, ‘हा खूप जुना विषय आहे. त्यावेळी कोणते अधिकारी होते, हे आता सांगता येणार नाही. आम्ही पोलिसांच्या तपासाची वाट पाहत आहोत. पोलिसांचा तपास सुरु असल्याने आम्ही काहीच करु शकत नाही’. खरं तर मिसाळ यांनी ज्यावेळी या कार्यालयाचा पदभार घेतला, त्या दिवसापासूनच मिसाळ यांची ही जबाबदारी आहे, की या कार्यालयात पाठीमागच्या काळात काय घडलं आणि ते कोणामुळे घडलं, याला जबाबदार कोण, याची सर्व माहिती पदभार घेतानाच मिसळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यायला हवी होती. याप्रकरणी जबाबदार असलेल्या संबंधितांचा शोध घेऊन त्यांची विभागीय चौकशी करण्याची मिसाळ यांची जबाबदारी असताना दुर्दैवानं मिसाळ यांना या जबाबदारीचा विसर पडला आहे.
सरकारी कार्यालयातली महत्वाची कागदपत्रं गहाळ होतात आणि ज्यांच्याकडून ही कागदपत्रं गाळ झाली, त्यांच्याविरुद्ध कुठलीच कारवाई का करण्यात आली नाही? मिसाळ हे नक्की कोणाला आणि का पाठीशी घालत आहेत? पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मिसाळ यांची जबाबदारी थांबते का? माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहिती मागितली असता अहिल्यानगरच्या सिटी सर्वे कार्यालयातली महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला. एवढं सारं रामायण, महाभारत होऊनदेखील मिसाळ हे संबंधित अधिकाऱ्यांच्या गंभीर चुकांवर पांघरुन घालत आहे. त्यामुळे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून मिसाळ आणि संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करावी, अशी मागणी अहिल्यानगरच्या नागरिकांमधून केली जात आहे.