लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या भूमी अभिलेख कार्यालयातले (सिटी सर्वे) काही अधिकारी जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांसह बिल्डर्स आणि उद्योजकांकडून किती रुपये उकळताहेत, हे जर सांगितलं तर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. पण या कार्यालयातल्या काही अधिकाऱ्यांकडून जमीन मोजणीसाठी तब्बल 4 लाख रुपये उकळण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या कार्यालयातल्या कागदपत्रांचं महसूलमंत्र्यांनी जर ‘ऑडिट’ करण्याचे आदेश दिले तर खूप मोठं ‘घबाड’ बाहेर येईल. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर सिटी सर्वे कार्यालयाचे प्रमुख असलेले अविनाश मिसाळ
यांना जाहीररित्या आमचं आव्हान आहे, की मिसाळ साहेब, उघडा डोळे पहा नीट. शेतकरी आणि उद्योजकांची आर्थिक लूट थांबवा.
अहिल्यानगर भूमी अभिलेख विभागाचं कार्यालय पूर्वीच्या काळी शासकीय विश्रामगृहाच्या (आय. बी.) शेजारी होतं. सध्या हे कार्यालय जुन्या कलेक्टर ऑफिसच्या आवारात आहे. या कार्यालयात जे अधिकारी काम करत आहेत, ते सर्वच नाहीत. मात्र त्यांच्यापैकी काही मोजणी अधिकाऱ्यांनी अनेक एजंटांना पोसलेलं आहे. या एजंटांच्या माध्यमातून शेतकरी आणि उद्योजकांकडून जमीन मोजणीच्या नावाखाली लाखो रुपयांची आर्थिक लूट केली जात आहे.
या कार्यालयातील काही मोजणी अधिकारी आणि एजंटांचा ज्यांना ज्यांना आर्थिक त्रास झाला आहे, अशा पिडित शेतकरी आणि उद्योजकांपैकी अनेकांनी आमच्याशी (लोकपत न्यूज नेटवर्क) खासगीत बोलताना त्यांना आलेल्या अडचणी आणि मनस्तापाबद्दल सांगितलं आहे. या मुस्कटदाबीबद्दल शेतकरी आणि उद्योजक जाहीरपणे बोलू शकत नाहीत. कारण या कार्यालयाकडे या सर्वच संबंधितांचे छोटं मोठं काम अडकलेलं असतं.
भविष्यात अडवणूक होऊ नये म्हणून अनेकजण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. या कार्यालयाचे अविनाश मिसाळ यांनी गुप्त पद्धतीने माहिती घेऊन शेतकरी आणि उद्योजकांच्या व्यथा जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही मोजणी अधिकाऱ्यांनी एका बिल्डरकडून 4 लाख रुपये घेऊनही त्या बिल्डरला चुकीचा रिपोर्ट दिल्याची जोरदार चर्चा आहे. मिसाळ यांनी या संदर्भात त्यांची यंत्रणा कामाला लावावी आणि शेतकरी उद्योजक त्याचप्रमाणे बिल्डर्स यांच्याकडून होत असलेल्या आर्थिक देवाण-घेवाणीचा समाचार घ्यावा, संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या निमित्तानं केली जात आहे.