लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या भूमी अभिलेख कार्यालयाचा (सिटी सर्व्हे) कारभार प्रचंड बेजबाबदारपणे सुरु असल्याचं वेळोवेळी समोर आलेलं आहे. नगरमध्ये असलेल्या पुणे बसस्थानकासमोरच्या गांजा डेपो या परिसरातल्या सिटी सर्व्हे कार्यालयातली महत्त्वाची कागदपत्रं सन 2013 ते 2019 या दरम्यान गहाळ झाली होती. या कार्यालयातल्या निमतानदार क्रमांक एक आणि दोन या अधिकाऱ्यांच्या कक्षात ही कागदपत्रं होती. या दोघांवरच हे रेकॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी होती. 2023 ते 2019 या कालावधीमध्ये जे निमतानदार क्रमांक एक आणि दोन यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठानं दिले होते. परंतु तरीदेखील महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या दोघांवर या कार्यालयातल्या वरिष्ठांचाच वरदहस्त असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
राजाराम भाऊसाहेब चौरे यांनी माहितीचे अधिकारात मागविलेल्या माहितीमुळे हा गंभीर प्रकार समोर आला. चौरे यांनी मागितलेली माहिती किंवा महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाल्यामुळे ती देता येत नाही, ही बाब निदर्शनात आल्यानंतर या कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सचिन मुसळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दि. 22. 10. 2023 रोजी रितसर तक्रार दिली आहे.
या कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी अविनाश मिसाळ यांच्याशी ‘लोकपत’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘2023 ते 2019 या काळात निमतानदार नक्की कोण होतं, हे शोधून काढणं अवघड आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही पोलिसांच्या कारवाईची वाट पाहत आहोत. दरम्यान, निमतानदार पदाच्या ज्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध वरिष्ठांनी कुठलीच कारवाई न करता त्यांना का पाठीशी घातलंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.