लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
महाराष्ट्र ही थोर संतांची वीर पुरुषांची भूमी आहे याच भूमीला संत ज्ञानेश्वरांपासून विविध संत महंतांचा पावन पदस्पर्श लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच भूमीत झाला. संत तुकाराम महाराज, सेना महाराज चोखा महाराज आदी संतांसह शनिमहाराज, गजानन गणपती महाराज या सर्वच संत महंत आणि देवीदेवतांच्या पावन पदस्पर्शानं महाराष्ट्राची ही भूमी पवित्र झाली. परंतु आई-वडिलांना सांभाळण्यासाठी निर्माण करण्यात आलेले वृद्धाश्रम हे या महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे, अशी खंत महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार वाणीभूषण ह. भ. प. आदिनाथ महाराज निकम यांनी व्यक्त केली.
गणेश जयंतीनिमित्त नेवासे तालुक्यातल्या सोनईजवळील हनुमानवाडी चौकातल्या सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कीर्तन सोहळ्यात उपस्थित गणेश भक्तांना संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी सोनई सोसायटीचे माजी चेअरमन विश्वासराव गडाख, भागवताचार्य तुलसी देवी आदींसह शेकडो गणेश भक्त उपस्थित होते. यावेळी ह. भ. प. निकम महाराजांचा सत्कार दिनकर येळवंडे यांच्या हस्ते करण्यात आला.