Thursday, January 23, 2025

आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारा नाथ संप्रदाय…! नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांच्या अमृतवाणीने श्रोते मंत्रमुग्ध…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर 

भगवान विष्णूंच्या आदेशावरून नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार धारण केले. नवनाथांचा हा नाथ संप्रदाय आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारा आहे, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांनी केले.

सिध्दी विनायक काॅलनीमधील श्रीगुरूपादुका मठात प्रथमच आयोजित केलेल्या प्रवचन सोहळ्यात ‘नाथांची दत्तभक्ती’ या विषयावर ते बोलत होते. श्रीगुरूपादुका मठाचेवतीने औक्षण करत शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून मिलिंद चवंडके यांना सन्मानित करण्यात आले.

प्रवचन करताना मिलिंद चवंडके पुढे म्हणाले, ‘आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणात प्रत्येक जण आनंदाचा शोध घेत आहे. नवनाथांचा नाथ संप्रदाय आपल्यास शाश्वत आनंदी जीवनाचा मार्ग दाखवताना जीवन कृतार्थ कसे करता येते? याचे गूज सांगतो. नाथ संप्रदायातील गूढ तत्वज्ञानाचा बारकाईने अभ्यास करताना नवनाथांनी कलीयुगातील भाविकांच्या कल्याणासाठी घेतलेले अथक परिश्रम डोळ्यांसमोर उभे रहातात.

आदिनाथ भगवान शंकर परमात्म्याकडून मिळालेले दिव्यज्ञान मच्छिंद्रनाथांनी भगवान श्रीदत्तात्रेयांकडून अनुग्रह मिळाल्यानंतर आपल्या नाथ संप्रदायाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या पुढ्यात ठेवले. गुरू गोरक्षनाथांनी हेच दिव्यज्ञान गहिनीनाथांना दिले. गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांनी हेच आत्मज्ञान ज्ञानेश्वर माऊलींना प्रदान केले. माऊलींनी नाथ संप्रदायाकडून आलेले हे दिव्य ज्ञान ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवले. हे ज्ञान म्हणजे नाथांच्या दत्तभक्तीमधून प्रगटलेले दिव्यदर्शनच होय.

आदिनाथ भगवान शंकर परमात्म्यापासून ज्ञान आणि भगवान श्रीदत्तात्रेयांचा उपदेश ही ज्ञानोत्तर भक्ती होय. गुरूभक्ती, योगसाधना व ज्ञान यांचा त्रिवेणी संगम नवनाथ भक्तिसार ग्रंथात झाला आहे. नवनाथांनी केलेल्या चमत्कारांची गाथा म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथ आणि श्रीनृसिंह सरस्वतींच्या चमत्कारांची गाथा म्हणजे श्रीगुरूचरित्र ग्रंथ आहे.

आपल्या देहाच्या साहाय्याने परमपदाची प्राप्ती करून घ्यायची असल्याने देहाचे उत्तम रक्षण करावे. उत्तम आरोग्य सांभाळावे. देह शुध्द ठेवण्यासाठी शुध्द शाकाहारी आणि निर्व्यसनी असावे. शुध्द आचरण व चारित्र्य संपन्नता आपणास भगवंतापर्यंत घेऊन जातेच. सद् गुरू भेटले की अध्यात्म मार्गावर चालण्याचा मार्ग प्रशस्त होत जातो. आपण परगावी जाण्याची जशी जय्यत तयारी करतो तशी तयारी भगवंताकडे पोहोचण्यासाठी केली पाहिजे. भगवंताकडे जाण्याची तयारी करण्यासाठी गुरूभक्ती उपयुक्त ठरते. गुरू आपल्या शिष्यास भगवंतास आवडेल असेच वागण्याचा सल्ला देताना या जन्माचे सार्थक कसे करायचे? हे नेमकेपणाने सांगतात, असे मिलिंद चवंडके यांनी विविध दाखले देत निरूपण करताना सांगितले.

प्रवचन सोहळ्यास सर्वश्री शशिकांत भास्करे, समीर भास्करे, श्रध्दा भास्करे, संगिता सौदागर, शशिकुमार पंडीत, विष्णू शिंदे, प्रवीण बासटवार, नायब तहसीलदार बालाजी कचरे, संजय उडगे, शंकर कुलथे, प्रथमेश घोडके, गोपाल खांडेकर यांच्यासह श्रीगुरुपादुका मठामधील भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

नाथांची दत्तभक्ती या विषयावर प्रथमच प्रवचन ऐकायला मिळाले, असे श्रोत्यांनी आयोजक समीर भास्करे यांना खास भेटून सांगितले. प्रवचन करताना मिलिंद चवंडके यांनी उच्चस्वरात केलेला नाथांच्या नावांचा गजर वातावरण मंत्रमुग्ध करून टाकणारा आणि उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभा करणारा ठरला.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी