लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनईसह अनेक गावांसाठी वरदान ठरणारी पाणी योजना सुमारे दोन वर्षांपासून ठप्प पडली आहे. या पाणी योजनेसाठी वापरण्यात येणारे विविध आकाराचे पाईप सध्या सोनईच्या हेमाडपंथी महादेव मंदिरालगत असलेल्या पाण्याच्या टाकी खाली अक्षरशः धूळ खात पडले आहेत. सोनईकरांना सध्या आठ दिवसांतून एकदा पिण्याचं पाणी येत आहे. तेदेखील अनेक भागात पुरेशा दाबाने येत नाही. परिणामी सोनईकरांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे
यांना आम्ही जाहीरपणे प्रश्न विचारु इच्छितो, की सोनईकरांना हक्काचं पाणी कधी मिळणार? संबंधित सरकारी यंत्रणेसह ठेकेदार कंपनीला तुम्ही जाब विचारणार आहात का?
खरं तर अहिल्यानगरच्या तारकपूर परिसरात असलेल्या जीवन प्राधिकरण कार्यालयाचं या पाणी योजनेवर नियंत्रण आहे. या कार्यालयातल्या अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांचा गलथान कारभार ही पाणी योजना रखडण्यासाठी पुरेसं कारण आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी जरा उग्रावतार धारण करत जीवन प्राधिकरण कार्यातल्या अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार कंपनीचा खरपूस समाचार घेण्याची गरज आहे.
सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी या योजनेसाठी सोनईसह वाड्यावस्त्यांवर जेसीबीनं खोदकाम करण्यात येऊन काळ्या रंगाचे पाईप जमिनीत गाडण्यात आले आहेत. माजी मंत्री शंकरराव गडाख
यांच्या कार्यकाळात ही योजना बऱ्यापैकी गतिमान झाली होती. राहुरी तालुक्यातल्या काही गावांनी या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केली होती. त्यासाठी विरोधदेखील झाला. मात्र तेव्हापासून ही पाणी योजना रखडली आहे. ही योजना कधी पूर्ण होणार, आणि हक्काचं पाणी कधी मिळणार, याची सोनईकर चातक पक्ष्याप्रमाणं वाट पाहत आहेत.
सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा सुरु आहे – आमदार विठ्ठलराव लंघे
यासंदर्भात आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं, की योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. या योजनेसाठी नक्की अडचण काय आहे, हे पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी कोणकोणते अडथळे येत आहेत, याचीदेखील जीवन प्राधिकरण च अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आहे. ही योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सरकार यंत्रणाकडे सातत्याने आमचा पाठपुरावा सुरु आहे.