लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यात सध्या कपाशीच्या बियाणांची काळ्या बाजाराने विक्री सुरू असून 900 रुपये किमतीची बॅग 1 हजार 300 रुपयांना विकली जात असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सुत्रांमार्फत हाती आली आहे. नेवासे तालुक्यात शेतीच्या मशागतीला सध्या वेग आला आहे. नांगरून ठेवलेल्या जमिनी चांगलाच आपल्या असून आता रोटा मारून कपाशी लावण्यासाठी सरी काढण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. मात्र कपाशीच्या बियाणांची चढ्या भावाने विक्री करणारे अनेक व्यापारी बळीराजाची आर्थिक लूट करत आहेत. या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना जाहीर आवाहन आहे, की बियाणे विक्रेत्यांच्या फसवणुकीवर करडी नजर ठेवा. कपाशीच्या बियाणाची तालुक्यात काळ्या बाजाराने विक्री होते आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध तहसीलदारांमार्फत कारवाई करुन बळीराजाला दिलासा द्या.
कृषीप्रधान असलेल्या आपल्या भारतात शेतकऱ्याला जगाचा ‘पोशिंदा’ म्हटलं जातं. मात्र याच ‘पोशिंद्या’चे आर्थिकदृष्ट्या लचके तोडण्यासाठी अनेकजण टपलेले असतात. यामध्ये खते आणि बियाणांची चढ्या भावाने विक्री करणारे व्यापारी, शेती उत्पादन बाजारात नेताना बाजार समिती परिसरातले दलाल आदींचा समावेश आहे. ही सारी मंडळी चारही बाजूंनी शेतकरी कसा लुटता येईल, याचाच विचार करत असतात. अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
राज्यातल्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कोणीही वाली उरला नाही.