लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे
यांनी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे
हे भविष्यात जे सांगतील, ते करण्याचा निर्णय आपण घेतलाय, अशी स्पष्ट ग्वाही एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिली. त्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे यांना आमचं (लोकपत न्यूज नेटवर्क अँड लोकपत यूट्यूब चॅनल, अहिल्यानगर) जाहीर आव्हान आहे, की आता शंभरच्या ‘स्पीड’ने काम करा. घोडेगाव आणि सोनईची पाणी योजना मार्गी लावा. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं उगमस्थान असलेला पवित्र परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचं धार्मिक स्थळ करण्यासाठी पुढाकार घ्या. या परिसरात देशाबाहेर असलेल्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांची गर्दी होईल, या दृष्टीने सक्षम असं नियोजन करा.
वास्तविक पाहता पालकमंत्री विखे जे बोलले, त्यात कोणाला शंका घेण्याचं काहीच कारण नाही. खरं तर आता नेवासा तालुक्याचे कर्ते धर्ते एकमेव आमदार लंघे हेच आहेत. ज्यांना ‘डिसिजन मेकर’ असंही म्हणता येईल. नेवासा तालूका हा विकासापासून कोसो दूर आहे. दुर्दैवानं या तालुक्यात चार रस्ते करणाऱ्यांनी खरं तर विकास ही चुकीची संकल्पना मांडलीय. या तालुक्यातल्या बेरोजगारांना काम मिळेल, या तालुक्यात जिल्ह्याबाहेरचा एखादा मोठा उद्योग समूह गुंतवणूक करील, या तालुक्यातल्या धार्मिक स्थळांचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार चेहरा मोहरा बदलला जाईल, या तालुक्यातल्या जनतेला २४ तास पिण्याचे पाणी मिळेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, महिलांना योग्य न्याय मिळेल किंबहुना महिला वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, तरुणांच्या हाताला काम मिळेल, असं काहीसं झालं तरच या तालुक्याचा विकास झाला, असं म्हणता येईल.
सुदैवाने पालकमंत्री विखे हे आमदार लंघे यांच्या मर्जीतले आहेत. वाढप्या जर ओळखीचा असला तर पंक्तीमध्ये काहीच कमी पडत नाही. किंबहुना पंक्तीतल्या सर्वांच्या आधी सर्वच्या सर्व खाद्य पदार्थ आपल्या ताटात येतात. नुसते खाद्यपदार्थच नाही तर पाणीसुद्धा जागच्या जागेवर आपल्याला मिळतं. आमदार लंघे यांचं नशीब बलवत्तर आहे. कारण पालकमंत्री विखे स्वतःहून म्हणतात, की ‘आमदार लंघे जे म्हणतील, ते करण्याचा निर्णय आपण घेतला आहे’.
घोडेगावची ४८ कोटी रुपयांची पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली असली तरी त्या ठिकाणचं काम अत्यंत मंद गतीने सुरु आहे. आमदार लंघे यांनी त्या पाणी योजनेच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. किमान त्या कामाला भेट देऊन सद्यस्थिती तरी डोळ्याखाली घालून घ्यावी, अशी घोडेगावकरांची इच्छा आहे. ‘लोकपत’ न्यूज नेटवर्कने या कामाचा घेतलेला आढावा प्रत्यक्ष तुम्हीच पहा.
‘सोनई’करांकडे डोळे झाक करु नका…!
विठ्ठलराव लघे यांना आमदार करण्याचा नेवासे तालुक्यातल्या अनेक गावांसह सोनईतल्या मतदारांचा सिंहाचा वाटा आहे. या गावातले व्यापारी, शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, महिला वर्ग या सर्वांनी लंघे यांना प्रामाणिकपणे मतदान केलं. त्या मतदानाची परतफेड म्हणून आमदार विठ्ठलराव लघे यांनी सोनईच्या मूलभूत प्रश्नांना प्रथम प्राधान्य द्यावं आणि सोनईतल्या मतदारांकडे दुर्लक्ष करु नये, अशी अपेक्षा सोनईसह बारा वाड्यांतल्या मतदारांमधून व्यक्त केली जात आहे.