लोकपत न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे. बीडमध्ये सध्या जंगल राज सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. या जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेच बीडचे आमदार सुरेश धस
हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अक्षरशः भीक मागण्याच्या तयारीत आहेत. आमदार धस यांचं भीक मागण्याचं कारण तुमच्या मनात जे आहे, ते मात्र नक्कीच नाही. तर ते काय कारण आहे, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा आणि नक्की जाणून घ्या.
बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणाकडे येणार, याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता व्यक्त केली जात आहे. धनंजय मुंडे जर बीडचे पालकमंत्री झाले तर आपल्याला खूप त्रास होईल, अशी भीती काही जण व्यक्त करत आहेत. मात्र आमदार सुरेश धस
कोणालाच घाबरत नाहीत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असावं. किंबहुना मुख्यमंत्री फडणवीस यांनीच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावं, अशी अपेक्षा आमदार धस यांनी व्यक्त केले असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर झोळी पसरून अक्षरशः भीक मागायलासुद्धा ते तयार आहेत.
या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी सांगितलं, की बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. या जिल्ह्यात अनेकांकडे गावठी पिस्तूल आहेत. वाळू माफिया, राख माफिया यांच्यामुळे या जिल्ह्यातली जनता प्रचंड दहशतीखाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी एक आव्हान म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारलं होता. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचं पालकमंत्री नक्कीच घ्यावं.
दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलंय, पालकमंत्रीपदाचा निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी जर सांगितलं, तर मी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेईन. असं असलं तरी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार, जे मंत्री आहेत त्यांना खाते वाटप कधी केलं जाणार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री फडणवीस घेतील का, या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची बीड जिल्ह्यातली जनता चातक पक्षप्रमाणं वाट पाहत आहे.