लोकपत न्युज नेटवर्क / मंत्रालय प्रतिनिधी मुंबई
राज्यात ऐन सरकार स्थापन करण्याचा पेचप्रसंग उभा राहिला असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या दरे या गावी गेल्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. शिंदे यांच्या शिवसेनेला राज्याचे गृहमंत्री पद हवं आहे का, यावरुन ते नाराज झाले आहेत, का अशी देखील चर्चा या निमित्तानं ऐकायला मिळाली.
दरम्यान, या संदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘सर्व गोष्टींबाबत चर्चा होईल. चर्चेतून अनेक गोष्टी निघतील. अनेक गोष्टी त्यामधून सुटतील. आम्हाला लोकांनी निवडून दिला आहे. त्या लोकांची बांधिलकी आम्हाला जपायची आहे.’
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन दहा दिवसाचा कालावधी उलटला तरीही सरकार स्थापन करण्याच्या कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत. माहितीचा मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी मुख्यमंत्री कोण, याविषयी अद्यापही प्रचंड उत्सुकता आहे. राज्याचं गृह आणि महसूल मंत्रीपद शिंदे गटाच्या शिवसेनेनं मागितलं असून त्याबाबत योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यानं मुख्यमंत्री नाराज झाले की काय, अशीदेखील शंका या निमित्तानं उपस्थित करण्यात येत आहे. या सर्व शंकांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज (दि. १) पडदा टाकलाय.