लोकपत न्युज नेटवर्क / मंत्रालय प्रतिनिधी / मुंबई
‘मला काय मिळालं, यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळालं, असा विचार करणारा मी सामान्य माणूस आहे. अडीच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कारभाराबद्दल मी समाधानी आहे. आम्ही लढणारे आहोत. रडणारे नाही’, असं म्हणत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानं मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडण्यास भाजप तयार नसल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याचं बोललं जात होतं. चार दिवस उलटूनही मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. स्पष्ट बहुमत असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा होती तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, अशी शिंदे गटाच्या शिवसेनेची इच्छा होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची त्यांची भूमिका आज (दि. २७) स्पष्ट केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मी मोकळा माणूस आहे. मी काहीही ताणून ठेवलेलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मी मंगळवारी फोन केला होता. मुख्यमंत्री बनवताना माझ्यामुळे अडचण आहे, असं तुमच्या मनात येऊ देऊ नका. तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुमचा निर्णय आम्हाला मान्य राहील’ असं मोदी आणि शहा यांना सांगितल्याचं शिंदे म्हणाले.
शेतकरी, महिला, युवक यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचंड असं काम केलं आहे. मुख्यमंत्री या पदाची कुठलीही हवा त्यांच्या डोक्यात गेली नाही. एक ‘कॉमन मॅन’ म्हणूनच ते आजही कार्यरत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्यानं भारतीय जनता पार्टी त्यांचा मुख्यमंत्री करु शकते. मात्र हा निर्णय कधी होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.