लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरातल्या आनंदी बाजार आणि पटवर्धन चौकातल्या रस्त्यांवरुन पायी जायचं ठरवलं तर तारेवरची कसरत करताना काय त्रास होतो, किती यातना होतात, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. आडमुठ्या महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या मनमानीमुळे स्थानिक नागरिकांच्या घराला जायला यायला रस्ता सुद्धा शिल्लक राहिला नाही. रस्त्याचं काम करताना संबंधित ठेकेदाराकडून कुठलाही नियम पाळला जात नाही, अशा तक्रारी संतप्त नगरकरांमधून केल्या जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नगरकरांच्यावतीनं सांगावसं वाटतं, की आयुक्त यशवंत डांगे, ‘चमकोगिरी’ थांबवा आणि अहिल्यानगरच्या जनतेला नरकातून बाहेर काढा.
शहरातल्या या रस्त्याचं काम मे महिन्याच्या सुरुवातीला शोधून काढलं गेलंय. वास्तविक पाहता सदर काम मार्च महिन्यामध्ये सुरु करायला हवं होतं. पण आता पावसाळा तोंडावर आला आणि अहिल्यानगरच्या महानगरपालिकेने आपली मोठी कामं या काळात काढली आहेत. या अवेळी काढण्यात आलेल्या कामांमुळे नागरिकांचे तर हाल आहेतच. पण हॉस्पिटलला येणाऱ्या रुग्णांचेही भीषण हाल होत आहेत. या रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी खोदकाम करुन महापालिकेने जमिनीखालून ‘हाय टेन्शन केबल’ टाकली आहे. या कामाला कोट्यावधी रुपये खर्च आला असून आता ही केबल रस्त्यातून काढायला ठेकेदार तयार होत नाही
ती केबल उचलायला सुद्धा वेगळे पैसे द्यावे लागलेले आहेत. सदर केबलचा शून्य उपयोग झाला असून
महानगरपालिकेचे पर्याय या शहरातल्या नागरिक आणि व्यापाऱ्यांचे कररुपी कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत.
हा रस्ता एकदा खणून झाला. वास्तविक पाहता संपूर्ण पाणी अडवून त्यात चेंबरचे कामे करणे अपेक्षित होते. पण वाहत्या पाण्यातच चेंबरची कामे एका दिवसात केली गेलेली आहेत. सदर चेंबर अतिशय ठिसूळ आहेत आणि त्या चेंबरला कुठलाही अर्थ नाही. त्या चेंबरवर गाळ टाकून परत त्यावर रोलर फिरवला गेला असून त्यात निम्म्या चेंबरचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सदर चेंबर महानगरपालिकेने परत बांधायला काढले आहेत.
या कामासाठी रस्ता परत एकदा खणला गेला आहे. रस्ता खणण्यासाठी कुठलंही गणित नाही. घराला यायचे जायचे रस्तेसुद्धा शिल्लक ठेवलेले नाहीत. पटवर्धन चौक, आनंदी बाजार इथल्या प्रत्येकाची यामुळे गैरसोय होत आहे. पटवर्धन चौकातल्या लोकांची अवस्था तर अत्यंत भीषण आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. नगरकरांनो, आम्ही खाली दिलेला हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईलच, की अहिल्यानगर महापालिकेचा सध्या कसा भोंगळ कारभार सुरु आहे.