बाळासाहेब शेटे पाटील
मो. नं. 70 28 35 17 47 (WhatsApp)
लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरातल्या चार खासगी रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र नाही. तीन खासगी रुग्णालयांनी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार परवान्यांचं नूतनीकरण केलेले नाही. दहा खासगी रुग्णालयांकडे मंजूर खाटा आणि प्रत्यक्ष आढळून आलेल्या खाटांमध्ये तफावत आढळून आली. पाच रुग्णालयांकडे ‘बायोमेडिकल वेस्टेज’ची व्यवस्थाच नाही. दहा रुग्णालयांच्या दर्शनी भागात दर सूची (rate list) लावण्यात आलेली नाही.
अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागाची ही सारी कर्तबगारी (?) उजेडात आणण्याचं कौतुकास्पद काम महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं आहे. या कामगिरीबद्दल प्रथमतः खरं तर त्यांचं हार्दिक अभिनंदन. आयुक्त डांगे यांच्या ही गंभीर बाब निदर्शनात आली. या गंभीर परिस्थितीला जबाबदार असलेल्या यापूर्वीच्या आरोग्य अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य आणि प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नगरकरांच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. आयुक्त यशवंत डांगे साहेब, यापूर्वीच्या आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची हिमंत दाखवाल का…? नागरी आरोग्याची बोंबाबोंब असताना यापूर्वीचे आरोग्य अधिकारी गोट्या खेळत होते का? हे ते प्रश्न आहेत.
महाराष्ट्र सुश्रृषागृह नोंदणी अधिनियम 2021 नुसार राज्यातल्या नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची तपासणी करुन दैनंदिनी सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यानुसार अहिल्यानगर महापालिका आरोग्य विभागाच्या पथकानं नोंदणीकृत 230 पैकी 215 रुग्णालयांची तपासणी केली. या तपासणीमध्ये 32 रुग्णालयांत त्रुटी आढळल्या. अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने या 32 खासगी रुग्णालयांना नोटीसा पाठविल्या आहेत.
महाराष्ट्र सुश्रृषागृह नोंदणी अधिनियम 2021 अंतर्गत खासगी रुग्णालयांकडून नियमांचे पालन होतं की नाही, याची खातरजमा या तपासणीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये आकारण्यात येणाऱ्या फी आणि इतर रुग्णालयीन सेवेचे शुल्क, दर पत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणं हे खासगी रुग्णालय व्यवस्थापनाला बंधनकारक आहे. महाराष्ट्र सुश्रृषागृह नोंदणी अधिनियम 2021 या नियमाच्या अंतर्भूत असलेली रुग्ण हक्क संहिता रुग्णालयाच्या दर्शनी भागात स्वच्छ अक्षरात लावण्यात आली आहे का, याची तपासणी अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागानं केली आहे.
अहिल्यानगर शहरातल्या ३२ रुग्णालयांनी महाराष्ट्र सुश्रृषागृह नोंदणी अधिनियमांची पायमल्ली केली आहे. अर्थात हे आत्ताच झालेलं नाही. मागच्या अनेक वर्षांमध्ये खासगी रुग्णालयांकडून राज्य शासन आणि स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं आणि या शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळण्याचं अघोरी पाप अहिल्यानगर महापालिकेचे आरोग्य विभागाकडून सुरु आहे. या पापामध्ये अहिल्यानगर आरोग्य विभागाचे यापूर्वीचे अधिकारी सहभागी असताना त्यांना फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मेहरबानी अहिल्यानगर महापालिका प्रशासनाने केली आहे. वास्तविक पाहता त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची हिंमत दाखवली जाणार का, हाच मोठा प्रश्न आहे.
… आणि डॉक्टर अनिल बोरगेंविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
आताच्या घडीची मोठी बातमी ही आहे, की अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे यापूर्वीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सध्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे आयुक्त डांगे यांनी डॉक्टर अनिल बोरगे यांना 7 जानेवारीपासून सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे. आरोग्य विभागाचा जो गलथान कारभार आहे, त्या कारभाराविरुद्ध त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. लाखो रुपयांची शासकीय रक्कम वैयक्तिक बँक खात्यात वळविणे या मुद्द्यासह अनेक गंभीर मुद्दे त्रिसदस्यीय समितीने अहवालातून दिले आहेत. त्यामुळेच डॉक्टर अनिल बोरगे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.