लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त (दि. ६) संपूर्ण राज्यात ‘ड्राय डे’ असतो. या दिवशी दारूची दुकानं पूर्णतः बंद असतात. या ‘ड्राय डे’च्या दिवशी जे दारुचं दुकान उघडण्यात आलं असेल त्या दारुच्या दुकानाचा परवाना रद्द करण्याचा अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. हा अधिकार वापरुन या विभागाने अहिल्यानगर शहरातल्या टिळकरोड भागात असलेल्या एका दारुच्या दुकानाचा परवाना नुकताच रद्द केला आहे. अर्थात या विभागाची ही कामगिरी अभिनंदनीय अशीच म्हणावी लागेल.
दुसऱ्या बाजूला अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात बिअर बारचं परमिट आणि लॉज असलेलं राहुल वाईन शॉप नावाचं एक दारुचं दुकान आहे. या वाईन शॉपमधून अनेक तळीराम दारुच्या बाटल्या खरेदी करुन अक्षरशः मोकळ्या मैदानावरच बसून दारु ढोसत बसतात.
अहिल्यानगर शहरातल्या नेप्ती परिसरासह अन्य ठिकाणी हातभट्टीची दारु तयार केली जाते. नेप्तीची दारु किंवा फुग्यातली दारु या नावाने ही दारू प्रसिद्ध असून अनेक जणं ती चोरुन लपून पिताहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहिल्यानगरचे जे एस. पी. आहेत, त्यांना आमचा जाहीर सवाल आहे, ‘एक्ससाइज डिपार्टमेंट’चे ‘एस पी साहेब’! अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात मोकळ्या मैदानात बसून दारु ढोसण्याची परवानगी तळीरामांना तुम्ही दिलीय का? जर अशी परवानगी देण्यात आलीच असेल तर अहिल्यानगरच्या नेप्ती आणि इतर ठिकाणी जी हातभट्टीची दारु तयार केली जाते, त्या दारुच्या निर्मितीला आणि ती हातभट्टीची दारु विकत घेऊन मोकळ्या मैदानावर ढोसत बसण्याची परवानगी तळीरामांना देण्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?
एकीकडे, महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यास सांगायचं. शूर – वीरांची भूमी असल्याचे सांगायचं. त्याग आणि तपश्चर्येची ही पवित्र भूमी असल्याचं सांगायचं. दुसरीकडे त्याच महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत देशी विदेशी दारुच्या विक्रीला आणि मोकळ्या मैदानावर ती दारु ढोसायला मूकसंमती द्यायची, अशी ‘डबल ढोलकी’ या राज्यात आणखी किती दिवस वाजवली जाणार आहे? अनेक राज्यात दारुबंदी यशस्वी झाली. महाराष्ट्रात ती केव्हा होणार, हाच खरा प्रश्न आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब! कठोर निर्णय घ्याच…!
राज्याच्या तिजोरीला हातभार लागावा, राज्याचे उत्पन्न वाढावं, यासाठी देशी आणि विदेशी दारु विक्रीवर राज्य सरकारनं मोठा अधिभार लावला आहे. अर्थात राज्य सरकारच्या या आर्थिक धोरणाला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. राज्यात लोकशाहीतल्या कायद्यानुसार वैध मार्गानं म्हणजे कायदेशीरपणे दारु विक्री करणे आणि दारु पिणं, हा मूलभूत स्वतंत्र्याचा एक भाग आहे. मात्र या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे. त्यांनी निर्माण केलेल्या शिवशाहीच्या कालखंडामध्ये हा धडा प्रकार कधीच नव्हता.
हिंदवी स्वराज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी छत्रपती शिवरायांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळाला वेगवेगळे पर्याय शोधण्याचे आदेश दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बेजबाबदार दारु विक्रेते आणि मोकळ्या मैदानावर बसून दारु पिणाऱ्या तळीरामांच्याबाबतीमध्ये एकदा कठोर निर्णय घ्यायलाच हवा, अशी अपेक्षा या राज्यातल्या शिवप्रेमी आणि निर्व्यसनी नागरिकांकडून केली जात आहे.