लोकपत न्यूज नेटवर्क / बीड
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या मुद्द्यावरून जे राजकारण केलं जात आहे, ते पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे. मात्र या हत्याकांडाचा तपास करत असलेल्या सीआयडी एसआयटी आणि पोलीस अशा सरकारी यंत्रणांच्या तपासकार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न तर सुरू नाही ना, अशी शंका राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित झाली आहे. याचं कारण असं आहे, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडासह खंडणी प्रकरणात सहभाग असल्यामुळे या गुन्ह्यातल्या सर्वच आरोपींना मकोका कायदा लावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे वाल्मीक कराड यांच्याविरुद्ध सुद्धा हा कायदा लागू करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू असला तरी कराड यांच समर्थकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अर्थात लोकशाहीमध्ये हा प्रत्येकाला अधिकार असतो. कराडच्या पत्नीने वाल्मीक कराडवरचा आरोप फेटाळून लावला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असलेले एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई असून आमदार सुरेश धस आणि तेली यांचे संबंध आहेत. त्यामुळे खरं तर या दोघांची सीडीआर काढा, अशी मागणी मंजिली कराड यांनी केली आहे.
या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना मंजिरी कराड म्हणाल्या, तेली आणि आमदार धस यांचे किती फोन झाले, हे या दोघांचे सी डी आर काढल्यानंतर समजून येईल. वंजारी समाज अल्पसंख्याक असल्यामुळे या समाजाला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांचा खून झाला त्यांचा आणि माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नाही. त्यांची एकमेकांशी ओळखदेखील नाही’.