लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य. याचा सरळ अर्थ असा, की सज्जनाचे रक्षण आणि दुष्टांचा विनाश. दुर्दैवानं या ब्रीदवाक्याचं महत्त्व अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला अजिबात समजलं नसावं. कारण ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला वैभव नायकोडी या तरुणाच्या अपहरण आणि खुनाची माहिती असूनही त्याने वरिष्ठांना तसं सांगितलं नाही. पोलीस हा जनतेचा रक्षक असतो. पण जनतेच्या रक्षणाच्या महत्त्वाच्या कार्यात असा हलगर्जीपणा होत राहिला तर जनतेनं कोणावर विश्वास ठेवायचा, हा मूलभूत प्रश्न आहे.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना आमचा जाहीर सवाल आहे, की नायकोडीच्या कुटुंबियांना न्याय मिळेल? अपहरण आणि खुनाची माहिती असणारा ‘तो’ पोलीस कोण आहे? कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यानं वरिष्ठांना कल्पना दिली असती तर कदाचित वैभव नायकोडीचा जीव वाचला असता. अहिल्यानगर शहर आणि परिसरात सध्या अशी चर्चा ऐकायला मिळते आहे, की वैभव नायकोडीचं अपहरण आणि खून केल्याचं कोणाला सांगू नये, आणि स्वतःला जीवंत ठेवण्यासाठी संदेश भागाजी वाळुंज (रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, नवनागापूर, अहिल्यानगर) याच्याकडे आरोपींनी तब्बल 50 हजारांची मागणी केली.
या प्रकरणात सर्वात संतापजनक माहिती अशी आहे, की अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यानं फोटो काढून वरिष्ठांना पाठविल्याचं आरोपी सांगत आहेत. असं जर असेल तर ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यानं वैभव नायकोडी याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न का केला नाही? या संदर्भात ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यानं वरिष्ठांना माहिती का दिली नाही? सुदैवानं एसपी राकेश ओला यांनी यामध्ये जे कोणी दोषी असल्याचं सिद्ध झाल्यानंतर संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
21 फेब्रुवारीला संदेश वाळुंज आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 फेब्रुवारीला वैभव नायकोडीचं अपहरण करण्यात आलं. विशेष म्हणजे दोघांना एकाच फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. एकीकडे बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच अहिल्यानगर शहरात अशी घटना घडते, सामान्य जनतेनं याचा अर्थ गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही, असा घ्यायचा का?
वैभव नायकोडीचं अपहरण आणि खून ज्या आरोपींनी केला, त्या आरोपींच्याविरुद्ध आणखी एक अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती आहे. संदेश वाळुंज याच्या अपहरणात अशीदेखील माहिती आहे, की अनिकेत उर्फ लपका याच्या सांगण्यावरुन करण शिंदे आणि रोहित गोसावी हे संदेश वाळुंज याला जबरदस्तीने त्याच्या घरातून घेऊन गेले. त्यानंतर अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातल्या गरवारे चौकात असलेल्या अनिकेत उर्फ लपकाच्या टपरीजवळ अनिकेत उर्फ लपका सोमवंशी, नितीन नन्ननवरे, महेश पाटील, सॅम उर्फ सुमित थोरात, करण शिंदे, विशाल कापरे, रोहित गोसावी, सोनू घोडके यांनी संदेश वाळुंजला सिमेंटच्या एका चेंबरमध्ये नग्नावस्थेत मारहाण केली.
तर मग अहिल्यानगरचा बिहार झालाय का?
संदेश वाळुंज याला ज्या पद्धतीनं त्रास देण्यात आला, ती पद्धत विचारात घेतली तर संदेशला मारहाण करणारे गुन्हेगार हे खऱ्या अर्थानं माणुसकीला कलंक आहेत. अवघ्या 19 वर्षांच्या मुलाला अशा अमानुष पद्धतीने मारहाण करणं आणि त्याला जीवंत सोडण्यासाठी निर्लज्जपणे 50 हजारांची मागणी करणं, हे माणुसकीच्या तत्वात बसत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात हे नक्की काय चाललंय? त्यातल्या त्यात शांतताप्रिय असलेल्या अहिल्यानगरमध्ये अपहरण, खून, एखाद्याला रात्रभर डांबून ठेवणं हे प्रकार होणार असतील तर अहिल्यानगरचा बिहार झालाय का, हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे.