Sunday, May 25, 2025

एस.पी. सोमनाथ घार्गे साहेब! ‘एलसीबी’ला आणखी ताकद द्या…! पण अन्य स्थानिक पोलीस ठाण्यांतल्या वरिष्ठांच्या कार्यपद्धतीकडे ‘कानाडोळा’ नकोच…! अहिल्यानगरची एलसीबी जोमात पण स्थानिक पोलीस ठाणी कोमात…!

बाळासाहेब शेटे पाटील 

लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर 

अभ्यासू नेतृत्व आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य त्याचबरोबर सहकाऱ्यांकडून काम करुन घेण्याचं कसब असलेले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांची एलसीबीची टीम गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड सक्रिय झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कोणताही गुन्हा घडला आणि त्या गुन्ह्यातले आरोपी जरी फरार झाले तरी त्या फरार आरोपींच्या अवघ्या काही तासांमध्ये मुसक्या आवळण्याची यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक आहेर आणि त्यांची टीम करत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला नव्यानेच लाभलेले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

यांना यानिमित्ताने सांगावसं वाटतं, की उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या अहिल्यानगर एलसीबीला आणखी ताकद द्या. परंतू हे करत असताना जिल्ह्यातल्या अन्य पोलीस ठाण्यांतले अधिकारी आणि त्यांच्या कार्यपद्धतीकडे मात्र तुमचं अजिबात दुर्लक्ष होता कामा नये, हीच या जिल्ह्यातल्या जनतेची रास्त आणि माफक अपेक्षा आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातून पदोन्नतीवर बदलून गेलेले राकेश ओला यांना जिल्हा पोलीस दलाच्यावतीनं निरोप देताना अहिल्यानगर जिल्ह्यात नव्याने नियुक्त करण्यात आलेले एस.पी. सोमनाथ घार्गे यांचं सहर्ष स्वागत करण्यात आलं. तसं पाहिलं तर एस.पी. सोमनाथ घार्गे यांना अहिल्यानगर हा जिल्हा अजिबात नवीन नाही. कारण यापूर्वी श्रीरामपूर उपविभागात पोलीस उपाधीक्षक या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. वेळोवेळी अहिल्यानगरमध्ये पोलीस दलाच्या महत्त्वाच्या बैठकांना ते उपस्थित राहिलेले आहेत. हा जिल्हा त्यांनी नीटपणे समजून घेतलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात काम करताना त्यांना कसलीही अडचण येणार नाही.

सांगायचा मुद्दा हा आहे, की अहिल्यानगरची एलसीबी प्रचंड सक्रिय झाली असून अनेक गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा शोध घेण्याची यशस्वी कामगिरी अहिल्यानगर एलसीबीच्या टीमने वेळोवेळी केलेली आहे. किंबहूना अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस दलात फक्त आणि फक्त एलसीबीचीच कामगिरी वरचढ ठरत आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर एलसीबीनं वेळोवेळी केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे या जिल्ह्यातली अन्य पोलीस ठाणी झाकोळली आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या सर्वच तालुक्यांतल्या स्थानिक पोलीस ठाण्यांतल्या अधिकाऱ्यांविषयी या जिल्ह्यातल्या जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजीचं कारण एवढंच आहे, की या जिल्ह्यातल्या स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांची तक्रार, फिर्याद किंवा एफआयआर लवकर दाखल करुनच घेतली जात नाही. मग तो गुन्हा बलात्काराचा असो, मारहाणीचा असो किंवा फसवणुकीचा असो.

स्थानिक पोलीस ठाण्यातले ठाणे अंमलदार (पुरुष आणि महिला दोघेही) तक्रारदाराची तक्रार किंवा फिर्यादीची फिर्याद घेण्यापूर्वी संबंधितांवर त्याने फिर्याद देऊ नये, यासाठी जबरदस्त दबाव आणतात, स्वतःला न्यायाधीश समजतात. फिर्यादीकडेच संशयाने पाहतात, अशा या जिल्ह्यातल्या शेकडो नागरिकांच्या तक्रारी आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार घेतली गेली नाही म्हणून अहिल्यानगरमध्ये एसपींना निवेदन देणारे अनेक नागरिक एस.पी. ऑफीसमध्ये भेटतात. स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्यामुळेच त्यांना अहिल्यानगरच्या एस.पी. ऑफीसमध्ये चकरा माराव्या लागताहेत. यामध्ये संबंधित नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जातो. या गंभीर बाबीकडे नवे एस.पी. सोमनाथ घार्गे नक्कीच लक्ष देतील, असा विश्वास या जिल्ह्यातल्या जनतेच्यावतीनं आम्ही (लोकपत डिजिटल मीडिया अँड लोकपत यूट्यूब चॅनल, अहिल्यानगर) व्यक्त करत आहोत.

मल्टीस्टेटच्या घोटाळ्यांकडे लक्ष द्या…!

काळ बदलला तशी गुन्हेगारांची ‘मोडस ऑपरेंटी’ अर्थात गुन्हा करण्याची पद्धतदेखील बदलली आहे. हल्लीच्या ऑनलाईन जमान्यात सायबर क्राईम प्रचंड वाढलं आहे. सहकार खात्याचा जो विषय आहे, तो म्हणजे वित्तीय संस्थांकडून गुंतवणूकदारांची करण्यात येणारी आर्थिक फसवणूक. अर्थात हा विषय सहकार खात्याइतकाच आर्थिक गुन्हे शाखेचादेखील आहे. पूर्वी अस्तित्वात असलेल्या पतसंस्था आणि बँकांना कोट्यवधी रुपये खर्च करुन मल्टीस्टेटचा दर्जा अक्षरशः ढापला जातो आहे. मात्र या मल्टीस्टेट मध्ये जो गैरव्यवहार होतो आणि त्यामध्ये अनेक सामान्य गुंतवणूकदार अडकले जातात, तेव्हा या गुंतवणूकदारांना पोलिसांकडून योग्य न्याय मिळतच नाही, हे या जिल्ह्यातलं वास्तव आहे.

याचं उदाहरणच द्यायचं ठरलं तर भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचं उदाहरण देता येईल. कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी या संस्थेचा चेअरमन भारत पुंड याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पुंड हा सध्या सबजेलमध्ये आहे. परंतू ज्यांनी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये ठेवी ठेवल्या, त्या ठेवीदारांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही. भाग्यलक्ष्मी ही एकच मल्टीस्टेट नाही तर अनेक मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले आहेत. याकडेदेखील एसपी सोमनाथ घार्गे यांना लक्ष द्यावं लागणार आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी