लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
मोठमोठ्या बाता मारणारा, गोड गोड बोलून केसानं गळा कापणारा, गुंतवणूकदारांना मोठमोठी स्वप्नं दाखवणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याला आकाशानं गायब केलंय की धरणीमातेनं गिळून घेतलंय, असा प्रश्न तमाम ठेवेदारांमधून उपस्थित केला जात आहे. अहिल्यानगरच्या एमआयडीसीचे पोलीस भारत पुंड याला अद्यापपर्यंत अटक का करु शकले नाहीत. यामध्ये काही आर्थिक तडजोड तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्त करत असलेले भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये ज्यांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत, अशा अहिल्यानगरच्या अनेक गुंतवणूकदारांनी येत्या दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये 50 कोटी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. यामध्ये 30 कोटी रुपयांच्या ठेवी अहिल्यानगरच्या ठेवीदारांच्या आहेत. तर 20 कोटी रुपयांच्या ठेवी छत्रपती संभाजीनगरच्या ठेवीदारांनी गुंतविलेल्या आहेत. ठेवी गोळा करताना भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड ठेवीदारांशी खूप गोड बोलायचा त्यांना विश्वासात घ्यायचा आणि नंतर आर्थिक फसवणूक करायचा असं उघडकीस आलं आहे.
दरम्यान, शेकडो ठेवीदारांच्या तक्रारीनंतर पुंड याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र पोलिसांना तो अद्यापपर्यंत सापडू शकलेला नाही.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याला अटक करण्यात अपयश आल्यामुळे अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावरच ठेवीदारांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. विशेष म्हणजे ठेवीदारांनी अहिल्यानगरच्या एसपी ऑफिससमोर आंदोलन करत निवेदनदेखील दिलं होतं.
‘लोकपत’ लवकरच सुरु करत आहे लोकप्रिय वृत्तमालिका…!
सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेला अहिल्यानगर जिल्हा आणि या जिल्ह्यातली सहकार चळवळ सर्वश्रृत आहे. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना याच जिल्ह्यात उभारला गेला. अनेक पतसंस्था, सोसायट्या, बँकांचे जाळे असलेला हा जिल्हा सहकार क्षेत्रातला दीपस्तंभ आहे. मात्र अलीकडच्या काळात मल्टीस्टेटचं वारं आलं आणि या सहकार क्षेत्राला प्रचंड घरघर लागली. या सर्वांचा लेखाजोखा मांडणारी लोकप्रिय वृत्तमालिका ‘लोकपत’ न्युज नेटवर्क लवकरच सुरु करणार आहे. या वृत्तमालिकेसाठी सहकार्य करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांनी आम्हाला (७०२८३५१७४७) तात्काळ संपर्क साधावा.