लोकपत न्यूज नेटवर्क / नाशिक
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून जवळपास 90 दिवसांपासून फरार असलेल्या कृष्णा आंधळेविषयी मोठी अपडेट नुकतीच हाती आली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांनी आता काही पथकं तैनात केली आहेत.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. तर कृष्णा आंधळे हा फरार आहे. कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्याकांडातला नववा आरोपी आहे.
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर कृष्णा आंधळेनं आरोपींच्या मोकारपंती ग्रुपवर व्हाट्सअप व्हिडीओ कॉल केल्याचं समोर आलं असून आता कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा लागला असल्याचं समोर आलं आहे.
एका मोटरसायकलवर कृष्णा आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. कृष्णा आंधळेने कपाळी टिळा लावला होता. स्थानिकाने हटकल्यानंतर तो दुचाकीवरुन पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
कृष्णा आंधळेचा घातपात झाला असल्याचा दावा विरोधी पक्षाने मध्यंतरी केला होता. याला कारणदेखील तसेच प्रबळ होतं. 90 दिवस उलटूनदेखील कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा पोलिसांना मिळू शकलेला नाही. त्यामुळे ही शंका व्यक्त केली जात होती. मात्र नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा जर खरा ठरला तर कृष्णा आंधळे च्या घातपाताविषयीचा विरोधकांचा जो दावा आहे, त्या दाव्यामध्ये काहीच अर्थ राहणार नाही. पोलिसांनी कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले असले तरी त्यात पोलिसांना यश येईल की नाही, याविषयी मात्र सध्या तरी कुठलीही शाश्वती देता येणार नाही.