लोकपत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर
शेतीमालाचं उत्पादन, हार्वेस्टिंग, सीडींग, मार्केटिंग, विपणन, विक्री, निर्यात आणि आयात अशी कृषी क्षेत्रातली महत्त्वाची कामं करणाऱ्या महाराष्ट्र राज्यात 12 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीमालाला योग्य हमी किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या कृषी खर्च आणि किंमत आयोगामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचा एक प्रतिनिधी घेण्यात यावा, अशी मागणी शनिशिंगणापूरचे पोलीस पाटील ॲडव्होकेट सयाराम बानकर यांनी केलीय.
या आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय पॉल शर्मा हे नुकतेच शनिशिंगणापूर इथं शनिदर्शनाला आले होते. त्यावेळी शनैश्वर संस्थानच्यावतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला असता ॲडव्होकेट बानकर एका पत्राद्वारे त्यांना ही विनंती केली. यावेळी कृषी तज्ञ राजेश सोनवणे, संशोधक सहाय्यक सागर जाधव, वरिष्ठ संशोधन सहाय्यक सचिन सातपुते आदी उपस्थित होते.
भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने संयुक्तपणे राबवलेल्या दुप्पट उत्पादन योजनेत या कंपन्यांचा फार मोठा सहभाग असल्याचं ॲडव्होकेट सयाराम बानकर यांनी या पत्रात म्हटलंय. रात्रंदिवस कष्ट करत असलेल्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं आणि त्यांनी पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी आगामी काळात केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करता यावा, यासाठी शेतकरी उत्पादन कंपनीचा प्रतिनिधी केंद्र सरकारच्या आयोगामध्ये घेण्याची आवश्यकता आहे, असंही ॲडव्होकेट सयाराम बानकर यांनी यावेळी सांगितलं.