लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा
नेवासे तालुक्यातल्या खामगाव चिकणी या गावातल्या सर्वे नंबर 55 आणि 56 या महार वतन (हाडोळे) वडिलोपार्जित जमिनीचा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी दादागिरी करून ताबा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात गोरक्षनाथ गोपीनाथ शेरे ( मो. नं
91 58 76 27 32) आणि बाबासाहेब रंगनाथ शेलार (मो. नं. 95 52 72 76 63) यांनी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिलंय.
या निवेदनात म्हटलं आहे, की जायकवाडी प्रकल्पामुळे पूर्वज विस्थापित झाले आणि उदरनिर्वासाठी गाव सोडून शहरात गेले. याचाच गैरफायदा घेऊन नेवाशातले सधन शेतकरी प्रकाश पांडुरंग ढोकणे, विलास विष्णू ढोकणे, भास्कर रामकिसन ढोकणे, कैलास भास्कर ढोकणे, महेश भास्कर ढोकणे (सर्व राहणार – खामगाव चिकणी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर) या सर्वांनी महार वतनाच्या जमिनीचा बेकायदेशीररित्या अनधिकृतपणे ताबा घेतला असून या क्षेत्राची ते कायमस्वरूपी वहिवाट करत आहेत.
या संदर्भात नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याशी चर्चा केली असता संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलवून घेणार असून दोघांचीही बाजू आम्ही ऐकून घेणार आहोत. मात्र यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी पोलीस घेणार असल्याचं पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसतानादेखील केवळ गोरक्षनाथ शेरे यांच्याबरोबर राहत असल्याने प्रकाश पांडुरंग ढोकणे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असून ढोकणे हे दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचं बाबासाहेब शेलार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.