Saturday, April 26, 2025

गृह तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…! शिवछत्रपतींचा महाराष्ट्र जुगाराच्या वाटेवर चाललाय…! सोलापूरच्या ‘या’ तरुणानं ऑनलाईन जुगारात विकली जमीन, सोनं आणि ट्रॅक्टर…! पालकांनो! उघडा डोळे बघा नीट…!

बाळासाहेब शेटे पाटील

लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रातल्या शिवनेरी किल्ल्यावर झाल्याचं आपण मोठ्या थाटात सांगतो. मात्र हाच महाराष्ट्र आता जुगाराच्या वाटेवर चाललाय. ही बातमी करताना आमच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जातेय. सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डूवाडी परिसरात राहत असलेल्या एका तरुणानं ‘चक्री गेम’ या ऑनलाईन जुगारात ९० लाख रुपये रोख रक्कम, सहा एकर जमीन, दोन तोळे सोनं, आणि ट्रॅक्टर विकलाय. गृह तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांच्यासह या राज्यातल्या तमाम पालकांना आम्ही जाहीर आवाहन करत आहोत, की उघडा डोळे बघा नीट…!

एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी असलेले आमचे मित्र राहुल कुलकर्णी यांनी या संदर्भात एक माहितीपूर्ण व्हिडिओ तयार केला असून फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो उपलब्ध आहे. त्या व्हिडिओची फेसबुक लिंक आम्ही मुद्दामहून तुम्हाला देत आहोत. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या मनात संतापाचा आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही. या बातमीच्या शेवटी आम्ही त्या व्हिडिओची लिंक देत आहोत. 

हल्ली अभ्यासाच्या नावाखाली बहुतांशी मुला-मुलींना पालकांनी अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिलेला आहे. या मोबाईलमध्ये अनेक प्रकारची नको ती माहिती खचाखच भरलेली असते. विशेषतः युट्युब (YouTube) या सोशल मीडियावर व्हिडिओ पाहताना प्रत्येक वेळेला ऑनलाईन जुगाराची जाहिरात पाहायला मिळते. अशा जाहिरातींना बळी पडून अनेक तरुण जुगारी बनत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने यावर पायबंद घालण्याची गरज आहे. अन्यथा या देशातला आणि महाराष्ट्रातला तरुण जुगाराच्या नादाला लागून देशोधडीला लागण्याची शक्यता आहे.

जुगार म्हणजे एकप्रकारे आर्थिक गुलामगिरीला आमंत्रण…!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला नेहमी छत्रपती शिवरायांचा जयजयकार करतात. छत्रपती शिवरायांचा त्यांना  अभिमान असल्याबद्दल आम्हालासुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल नितांत आदर आहे. परंतू महाराष्ट्रातला तरुण वाचवायचा असेल तर केंद्र सरकारला साकडं घालून ऑनलाईन जुगाराचा हा महाराक्षस ठार मारण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खरं तर पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कारण हा जुगार म्हणजे एक प्रकारे आर्थिक गुलामगिरीला आमंत्रण किंवा निमंत्रण आहे, असंच म्हणावे लागेल. ज्या तरुणाकडे सहा एकर जमीन होती, 90 लाख रुपये रोख रक्कम आणि सोनं होतं, ते सारं या जुगारात हरवलंय. दुर्दैवानं त्या तरुणाच्या कुटुंबातले अनेक सदस्य आज मोलमजुरी करत आहेत. महाराष्ट्राच्या तरुणाला आर्थिक गुलामगिरीपासून वाचवायचं असेल तर मुख्यमंत्री फडणवीस

यांनी नक्कीच काही तरी करायला हवंय.

अनेकांनी केलाय आत्महत्येचा प्रयत्न…!

या ऑनलाईन जुगाराच्या नादाला लागून कर्जबाजारी झालेल्या आणि मनोधैर्य खचलेल्या अनेक तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं या फेसबुक व्हिडिओतून तुम्हाला ऐकायला  मिळेल. एका तरुणानं रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता तो फेसबुक व्हिडिओ तुम्ही प्रत्यक्ष पहा आणि त्यातून काही घेता आलं तर नक्की घ्या, धन्यवाद.

विशेष सूचना :

ही लिंक काही सेकंद दाबून ठेवल्यावर open हा शब्द येईल. त्यावर क्लिक केलं, की ही फेसबुक लिंक ओपन होईल. ही लिंक जास्तीत जास्त तरुणांपर्यंत जाईल, त्या दृष्टीनं प्रचंड व्हायरल करा. 

https://www.facebook.com/share/v/1YRYPsY7rF/

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी