लोकपत डिजिटल मीडिया न्यूज / अहिल्यानगर
एखाद्या संतांच्या नावानं मल्टीस्टेटची स्थापना करायची आणि त्या मल्टीस्टेटमध्ये जावई, भाऊ, मेहुणा, मावस भाऊ, चुलत भाऊ अशा गोतावळ्यातल्या लोकांना व्हाईस चेअरमन आणि मल्टीस्टेटचं डायरेक्टर, क्लार्क, मॅनेजर करायचं. स्वतः अध्यक्ष व्हायचं आणि या सर्वांच्या माध्यमातून ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींवर डल्ला मारायचा, हे असले उद्योग गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात सुरु आहेत. विशेष म्हणजे ज्यांचे खायचे वांदे होते, अशा लोकांनी गावाकडे 50 लाख ते एक कोटीपर्यंतचे बंगले बांधले. हा सर्व पैसा ठेवेदारांचा आहे, याची कसून चौकशी झालीच पाहिजे.
दरम्यान, अहिल्यानगर शहरातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये पतसंस्था, मल्टीस्टेट, मल्टीनिधी कंपन्यांच्या विरोधात आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याचे एस.पी. राकेश ओला यांनी दि. ४ एप्रिल रोजी या संदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. परंतु या परिपत्रकाकडे जिल्ह्यातल्या पोलिसांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) दत्तात्रय कराळे यांच्याकडे अनेक गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या. पतसंस्था, मल्टीस्टेट, मल्टिनिधी कंपन्या राष्ट्रीय अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे काम करत आहेत. खरं तर असं काम करणाऱ्या संबंधित गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची आवश्यकता आहे. परंतु या संदर्भात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे.
एस. पी. राकेश ओला यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे, की आर्थिक गुन्हे हे फौजदारी गुन्ह्यांपेक्षा वेगळा स्वरुपाचे असतात. आर्थिक गुन्ह्यांमुळे केवळ आर्थिक नुकसानच होत नाही तर व्यक्ती आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा नुकसान होत असतं. सुरक्षिततेवर देखील त्याचा विपरीत परिणाम होत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
आर्थिक गुन्ह्यांमध्ये अपहार करण्यात आलेल्या रकमेतही प्रचंड मोठी वाढ होत आहे. हे सारं लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आर्थिक गणेश शाखेची स्थापना करण्यात आलेली आहे. कंपनी ॲक्ट 2013 अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या कंपनीकडून मोठ्या स्वरूपाची फसवणूक, क्लिष्ट, किचकट आणि गुंतागुंतीचे बँकांचे मोठ्या स्वरूपातले अपहार, सहकारी संस्था अधिनियम 1960 या कायद्याखाली नोंदविलेल्या पतसंस्था आणि इतर संस्थांकडून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झालेली आहे. या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची नितांत आवश्यकता आहे.
भारत पुंड, संदीप थोरात यांच्यानंतर आणखी एका ‘मल्टीस्टेट’चा घोटाळा…!
नेवासे तालुक्यातल्या भारत पुंडची
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट आणि नगर तालुक्यातल्या संदीप थोरातची
सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनीनं अनेकांना गंडवलं. अनेक ठेवीदारांच्या ठेवी या दोघांनी हडप केल्या. सध्या हे दोघे जेलची हवा खात आहेत. अशातच नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या तिरुपती कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या आणखी एका मल्टीस्टेटकडून ठेवीदारांचा केसानं गळा कापण्यात आला आहे. या मल्टीस्टेटचा चेअरमन सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. ठेवीदारांच्या तगाद्यांना तो वैतागून गेला आहे. या मल्टीस्टेटमध्ये एका खातेदाराच्या ‘गोल्ड लोन’मध्ये मोठी ‘गडबड’ झाल्याचं समोर आलं असलं तरी संबंधित खातेदाराला या मल्टीस्टेटकडून दिनांक 15 एप्रिलपर्यंत समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र या खातेदाराला संबंधित मल्टीस्टेटकडून खरोखरच न्याय मिळणार का, हे पहाणं मोठं रंजक ठरणार आहे.