लोकपत न्यूज नेटवर्क / बीड / प्रतिनिधी
बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले तरी पोलिसांना तीन आरोपींना अटक करण्यात अपयश येत आहे. विशेष म्हणजे या हत्याकांडाचा ‘मास्टरमाईंड’ असलेला वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला. पण या गुन्ह्यातले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाले आहेत. बीडच्या एलसीबीने या आरोपींना फरार घोषित केलं असून या फरार आरोपींच्या शोधासाठी 9 पथके रवाना झाली आहेत.
बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. यामध्ये म्हटले आहे, की घुले आंधळे आणि सांगळे या तीन आरोपींविरुद्ध खुनासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यापासून हे तीनही आरोपी फरार आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या फोटोतल्या आरोपींविषयी कोणाला काही ठावठिकाणा माहीत असल्यास किंवा हे आरोपी दिसल्यास पोलिसांच संपर्क साधावा.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा तपास प्रचंड गुंतागुंतीचा होत आहे. गेल्या 22 दिवसांमध्ये या तपासात फारशी प्रगती दिसून आली नाही. सुदैवानं ‘मास्टरमाईंड’ वाल्मीक कराड शरण आला. कराड याच्यासह चार आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मात्र घुले, आंधळे आणि सांगळे हे तीनही आरोपी फरार आहेत. पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी यातला आरोपी सुदर्शन घुले हा परदेशात पळून गेला तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
‘त्या’ मोबाईल आणि व्हिडिओचं काय? कराडची ‘नार्को टेस्ट’ होईल का?
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात दोन-तीन दिवसांपूर्वी दोन मोबाईल आढळल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाली. यातल्या एका मोबाईल वरून मोठ्या नेत्याला फोन करण्यात आल्याचा दावादेखील करण्यात आला. मात्र हा मोठा नेता कोण, हा प्रश्न अनुचरितच आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती जो व्हिडिओ आणि मोबाईल आढळला, त्याचं पुढं काय झालं, वाल्मीक कराड याची नार्को टेस्ट होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.