लोकपत डिजिटल मीडिया / मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धिंगाणा अजूनही कायम आहे. येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या चार दिवसांमध्ये 15 जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, उद्या म्हणजे दि. १० मे रोजी सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अहिल्यानगर, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
११ आणि १२ मे रोजी संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही दिनांक १२ मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गारपिटीमुळे भाजीपाला, फळबागा आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेआधी म्हणजे १३ मेच्या आसपास अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा उन्हाळ्यात तब्बल ५० दिवस उष्णतेची लाट अनुभवली गेल्याने, लवकर येणारा मान्सून नागरिकांसाठी दिलासादायक ठरु शकतो.