संपादकीय…!
पालक मित्रांनो, नमस्कार. तुम्ही सर्व सूज्ञ, सुजाण आहात. याशिवाय तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईलदेखील आहे. त्यामुळे काल – परवा सोशल मिडियावर व्हायरल झालेला छत्रपती संभाजीनगरचा एक हृदयद्रावक व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल. काय वाटलं हो तुम्हाला तो व्हिडिओ पाहून? काय म्हणालात? व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नाही? ठीक आहे, तो व्हिडिओ तर आम्ही तुम्हाला पाठवू शकत नाही. मात्र त्या व्हिडिओत काय आहे, याचं वर्णन शब्दांतून करतो आहोत. पण हे सगळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट मन लावून वाचा बरं. कारण पालक म्हणून ही तुमची नक्कीच जबाबदारी आहे.
मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये असं भयंकर दृश्य होतं, की ते पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकणार. साक्षात मृत्यू कशाला म्हणतात, याची प्रचिती नक्कीच तुम्हाला आल्यावाचून राहणार नाही. एक पंधरा वर्षे वयोगटातला लाल टी-शर्ट आणि काळसर निळी जीन्स पॅन्ट घातलेला एक छोटा मुलगा त्याच्या किंवा त्याच्या शेजारच्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. त्या गच्चीवरून वीजवाहक तारा गेल्या होत्या आणि त्या मुलाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या दुर्दैवानं त्या वीज वाहक तारांमधून वीज प्रवाह सुरु होता. हे कदाचित पतंगाच्या नादात तो मुलगा विसरला असेल.
त्या मुलानं नकळत वीज वाहक तारेला हात लावला. त्यानंतर काय झालं असेल याची तुम्ही कल्पनासुद्धा करु शकत नाही. त्या मुलाचा वीजवाहक तारेला स्पर्श होताच वीजेनं त्याला खेचून घेत त्याच्या शरीरातलं सारं रक्त शोषून घेतलं. मित्रांनो, तो व्हिडिओ पाहूनच भावना अनावर होतात. त्या छोट्या मुलाच्या जीन्स पॅन्टीतून अक्षरशः आगीचे लोळ बाहेर पडत होते. इतका तो प्रचंड वीज प्रवाह घातक आणि ज्वालाग्रही होता.
त्या चिमुरड्यांवर विजेच्या माध्यमातून काळानं घाला घातला. पण विचार करा, त्या चिमुरड्याच्या घरातल्या म्हणजे त्याचे आई, वडील, बहिण, भाऊ, आजी, आत्या, जवळचे नातेवाईक, लांबचे नातेवाईक, शेजारी पाजारी या सर्वांच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल. या व्हिडिओबरोबरच आणखी एक बातमी आली, की तेरा वर्षांची एक मुलगी पतंग उडवत असताना विहिरीत पडून मरण पावली. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील चायना मांजामुळे अनेकांचे गळे कापतील. अनेक पक्षी जखमी किंवा मरण पावतील. पण तुम्ही आम्ही यातून बोध कधी घेणार आहोत, हाच खरा प्रश्न आहे.
राज्यातल्या आणि देशातल्या सर्वच चिमुरड्यांना या निमित्तानं विचारावसं वाटतं, की पतंग महत्वाचा आहे की तुमचा जीव महत्त्वाचा? मकर संक्रात जवळ येत आहे. पालकांनी आपापल्या चिमुरड्यांवर डोळे उघडे ठेवत त्यांची काळजी घ्यावी, एवढेच या निमित्तानं सांगायचंय. धन्यवाद.