- बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातलं चौंडी हे अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाची बैठक येत्या दि. 29 रोजी याच चोंडी गावामध्ये होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही काहीशी भूषणावह बाब असली तरी मंत्रीमंडळाच्या या बैठकीतून अहिल्यानगरसह राज्याला काय मिळणार, अहिल्यानगर आणि राज्याच्या हिताचे नक्की कोणते निर्णय मंत्रीमंडळाच्या या बैठकीतून घेतले जाणार आहेत, हा खरं तर या जिल्ह्यातल्या प्रत्येकाच्या कुतूहलाचा आणि उत्कंठतेचा विषय आहे. मंत्रीमंडळाच्या या संभाव्य बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कारभाऱ्यांना आम्हाला जाहीरपणे असं विचारायचंय आणि सुचवायचंय, की चौंडीतल्या मंत्रीमंडळ बैठकीतून अहिल्यानगरसह राज्याला आणि काय मिळणार आणि जर काही मिळणारच असेल तर प्रत्येक तालुक्यांत अशा बैठका घ्या.
जामखेड तालुक्यातल्या चोंडीत दि. 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या पार्श्वभूमीवर कराव्या लागणाऱ्या तयारीसाठी तब्बल एक कोटी 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत आल्या आहेत. या बातम्यांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाविस्कर यांनी या आकडेवारीमध्ये दुरुस्ती केली आहे. बाविस्कर यांचं म्हणणं असं आहे, की यावर एक कोटी 50 लाख नाही तर एक कोटी 28 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आता यामध्ये तब्बल 22 लाखांचा गफला कोणी केला, 22 लाख नक्की ज्यादा कोणी लावले आणि कमी कोणी दाखवले, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्र्यांना या बातमीच्या माध्यमातून तमाम नगरकरांच्यावतीनं आम्हाला विचारायचंय, की मंत्रीमंडळाच्या या बैठकीतून नगर शहराच्या बकाल अवस्थेला न्याय मिळणार आहे का? या शहराच्या औद्योगिकीकरणाचा विकास आणि विस्तार होणार आहे का? बेकायदा देशी-विदेशी दारु विक्री करणाऱ्यांवर जरब बसणार आहे का? या शहराच्या पर्यटन वाढीमध्ये ठोस अशा उपायोजना केल्या जाणार आहेत का? या शहरातल्या भुईकोट किल्ल्याच्या पर्यटनवाढीचा या बैठकीत विचार केला जाणार का? अवतार मेहेरबाबांची पवित्र भूमी असलेल्या परिसराचा विकास करण्याचा निर्णय या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार का? या शहरातले 41 ओढे आणि नाले गायब करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत केला जाणार आहे का? ज्या परिसरात शहाजीराजांचे बंधू शरीफजी राजे शहीद झाले, त्या भातोडी गावचा विकास करण्याची बुद्धी सध्याच्या मंत्रीमंडळातल्या सत्ताधाऱ्यांना येईल का?
… तर मग प्रत्येक तालुक्यांत अशा बैठका घ्या…!
अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यात असलेल्या चौंडी गावात दि. २९ रोजी मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीवर एक कोटी 50 लाख किंवा एक कोटी 28 लाख असा जो काही खर्च केला जात आहे, त्यातून चोंडी गावात काही तरी महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहेत. किंबहुना चोंडीकरांच्या उपयोगासाठी यातून हे सरकार काही तरी करणार, हे मात्र नक्की. ज्याप्रमाणे चौंडी गावात अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ जगाला देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांसह त्यांच्या भावंडांचा पावन पदस्पर्श नेवाशाला झालेला आहे. त्यामुळे नेवासे गावातही मंत्रीमंडळाची अशीच एखादी बैठक आयोजित करुन दोन पाच कोटी खर्च करावेत, अशी उपरोधिक मागणी आम्ही राज्याच्या कारभाऱ्यांना करत आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…! काय झालं ‘त्या’ विकास आराखड्याचं?
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता नेवासे तालुक्यातल्या माळी चिंचोरे परिसरात झाली होती. त्यावेळीही आणि आताही मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी या सांगता सभेत जाहीरपणे सांगितलं होतं, की नेवासा तालुक्याचा एक हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. फक्त सही करणं बाकी आहे. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही लगेच तो विकासा आराखडा मार्गी लावू. मात्र भाजपची सत्ता आली नाही. परंतू पुन्हा एकदा भाजप हा मोठा राजकीय पक्ष सत्तेत आला असून मुख्यमंत्री योगायोगाने देवेंद्र फडणवीस हे झाले आहेत. त्यामुळे त्यांना आमचा जाहीर सवाल आहे, नेवाशाच्या 1 हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचं काय झालं?
… महागाई वाढलीय आता डबल करा…!
2019 मध्ये केलेल्या घोषणेची किंबहुना नेवासकरांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेवासा तालुक्याच्या विकास आराखड्यासाठीच्या खर्चात महागाईचा विचार करत दुपटीने वाढ करावी. एक हजार कोटीऐवजी आता दोन हजार कोटी रुपयांचा नेवासा तालुक्याचा विकास आराखडा मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने मंजूर करावा, अशीदेखील उपरोधिक मागणी आम्ही या निमित्तानं करत आहोत.