लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा छावा हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटात एक सीन आहे. युवराज छत्रपती संभाजी राजे बऱ्हाणपूरची लूट करुन रायगडावर येतात. तेव्हा राणी येसूबाई त्यांना ओवाळते. छावा चित्रपटातल्या त्या प्रसंगात धाराऊ हे एक वयस्कर असं महिला पात्र आहे आणि ते पात्र कोणत्या अभिनेत्रीने रंगवलंय, याविषयीची माहिती तुम्हाला या बातमीतून आम्ही सांगणार आहोत.
बऱ्याच नाटकांतून काम केलेल्या, एकेकाळी बँकेत अधिकारी असलेल्या आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नी असलेल्या नीलकांती पाटेकर
असं या अभिनेत्रीचं नाव आहे. अभिनेते नाना पाटेकर यांना एका मुलाखतीत ‘तुम्ही निलकांती यांना केव्हा भेटला होतात? ‘जात न पुछो साधु की’ या नाटकावेळी का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. नाना पाटेकर यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना पत्नीमुळेच इंडस्ट्रीत करिअर करू शकल्याचं विधान केलं होतं. “हो. तेव्हाच भेटलो होतो. ती नाटकात काम करायची आणि बँकेत अधिकारी होती.
आम्हाला एका शोचे ५० रुपये मिळायचे आणि तिला अडीच हजार रुपये पगार होता. मी १५-२० शो केले तर ७५० रुपये मिळायचे. पूर्ण महिना ३० शो केले तर दुप्पट मिळायचे, पण तरी फक्त १५०० मिळायचे. तिने मला म्हटलं की तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. माझ्यावर तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. यश मिळेल की नाही, हे त्यावेळी माहीत नव्हतं,” असं नाना म्हणाले होते.