बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या जगप्रसिद्ध श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या संभाव्य विश्वस्त मंडळसंदर्भात एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आलाय. दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी झालेल्या शनिशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत या ठरावाला मंजुरी देण्यात आली. हा ठराव नक्की कसा आहे, याविषयी जाणून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा.
शनिशिंगणापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा मागच्या महिन्यात दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी या ग्रामपंचायतीचे महिला सरपंच पुष्पाताई बाळासाहेब बानकर, उपसरपंच स्वप्निल बाळासाहेब बोरुडे, ग्रामसेवक दादासाहेब नारायण बोरुडे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. या ग्रामसभेत एका महत्त्वाच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली.
शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची नेमणूक सन 2018 या अधिनियमाप्रमाणे करण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरु आहेत. मात्र या हालचालींना शनिशिंगणापूर ग्रामस्थांचा विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या देवस्थानच्या संभाव्य विश्वस्त मंडळांमध्ये जी व्यक्ती शनिशिंगणापूर या गावची रहिवासी आहे, केवळ त्या व्यक्तीलाच विश्वस्त आणि अध्यक्षपदी संधी देण्यात यावी. 2018 हा अधिनियम रद्द व्हावा, या देवस्थानचं संभाव्य विश्वस्त मंडळ स्थानिक ग्रामस्थांचं असावं आणि या देवस्थानच्या आर्थिक व्यवहारात स्थैर्य आणि शिस्त राहावी, यासाठी या देवस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, असं या ठरावात म्हटलं आहे.
‘त्या’ कोषाध्यक्षाविरुध्द गुन्हा दाखल होणार…?
शनिशिंगणापूर देवस्थानच्या कोषाध्यक्षपदी यापूर्वी जो पदाधिकारी होता, त्या पदाधिकाऱ्याने अधिकाराचा दुरुपयोग करत होर्डिंग जाहिरातींच्या बिलापोटी लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. स्वतःच्याच नावावर असलेल्या जाहिरात एजन्सीमार्फत देवस्थानच्या दानपेटीतून लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचं यातून समोर आलं आहे. या कोषाध्यक्षाविरुद्ध लवकरच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद देण्यात येणार असून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. शनिशिंगणापूर देवस्थानचे एक माजी विश्वस्त यासाठी पुढाकार घेणार असल्याचं बोललं जात आहे.