लोकपत न्यूज नेटवर्क / जळगाव
जळगावच्या पाचोरा रेल्वेस्थानकाजवळ आज (दि. २२) दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी भीषण अपघात झाला. पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेच्या बोगीमध्ये आग लागली की अफवा पसरल्यानंतर रेल्वेची चैन ओढण्यात आली आणि प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. दरम्यान, समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने प्रवाशांना उडविल्याची माहिती आहे. अनेक प्रवाशांचे तुटलेले हात आणि पाय पटरीर पडले आहेत. बचाव कार्याला सुरुवात झाली असून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
पुष्पक एक्सप्रेसचा नेहमीप्रमाणे प्रवास सुरू होता. मात्र या ट्रेनमध्ये आग लागल्याचे अफवा कोणी तरी पसरवली आणि घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी या ट्रेनमधून उड्या मारल्या. दुर्दैवाने समोरून येणाऱ्या बंगळूर ट्रेनखाली हे प्रवाशी चिरडले गेले. वास्तविक पाहता पुष्पक एक्सप्रेस या ट्रेनमध्ये कुठली आग लागलेली नव्हती. अचानक ब्रेक दाबल्याने चाकांमधून ठिणग्या आणि धूर आला असल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघात स्थळी 108 ॲम्बुलन्स तैनात करण्यात आल्या असून प्रांत अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तीन हॉस्पिटल्सना तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघातामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.