लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा / प्रतिनिधी
रासायनिक खत कंपन्या नेहमी काही ना काही लिंकिंग देत असतात. त्यामुळे खत विक्री करताना प्रचंड अडचणी येत आहेत. रासायनिक कंपन्यांचं हे लिंकिंग बंद करावं. असं झालं नाही तर खत विक्रीचे परवाने सरकारला परत देऊ, अशी भूमिका नेवासे तालुक्यातल्या खत विक्रेत्यांनी घेतली आहे. या संदर्भात नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार यांना नुकतंच एक निवेदन देण्यात आलं.
या निवेदनात म्हटलं आहे, की सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामात रासायनिक खतांना मागणी आहे. परंतु कंपन्या या खतांसोबत लिंकिंगची सक्ती करत आहेत. युरिया खताबरोबर अनावश्यक लिंकिंगची सक्ती सध्या केली जात आहे. या खताची आवश्यकता नसतानादेखील रासायनिक खत कंपन्या दुकानदारांना ही सक्ती करत आहेत.
एखाद्या दुकानदाराने रासायनिक खत कंपनीला विरोध केल्यास त्याला खत पुरवठा केला जात नाही. संबंधित दुकानदाराची जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते. आवश्यक असलेल्या खताचे भाडेदेखील खतविक्रेत्याकडून वसूल केले जाते. त्यामुळे खत विक्रेते अडचणीत सापडले आहेत. संबंधित खत कंपन्याशी संपर्क साधून ही लिंकिंग बंद करावी, असंदेखील या निवेदनात म्हटलं आहे.
यावेळी खत विक्री संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रवीण सावंत, माजी सभापती रावसाहेब कांगुणे, योगेश सोनवणे, बाबासाहेब खिलारी, राहुल मुनोत, कमलेश नहार, सुहास टेमक, अमृत उभेदळ, तानाजी मोरे, विक्रम बेल्हेकर आदींसह अनेक खत विक्रेते उपस्थित होते.