लोकपत न्यूज नेटवर्क / परभणी / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरही राज्याचं राजकारण थांबायला तयार नाही. या संदर्भात दररोज वेगवेगळे खुलासे केले जात आहेत, इशारे दिले जात आहेत. मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरु न देण्याचा आणि देशमुख कुटुंबियांना यापुढे कोणी धमकी दिली दांडके घेऊन रस्त्यावर उतरु, असा इशारा दिला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी परभणी जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात जरांगे पाटील यांनी मंत्री मुंडे यांचं नाव घेऊन हा इशारा दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले, ‘मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे बीड पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना कोणी तरी धमकी दिली. यापुढे देशमुख कुटुंबियांना कुणी धमकी दिली तर रस्त्यावर दांडके घेऊन उतरू तसेच मंत्री मुंडे यांना फिरू देणार नाही’.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडतात, असा प्रश्न उपस्थित करत जरांगे पाटील यांनी या आरोपींना कोणता मंत्री संरक्षण देतो, याची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणातले सर्वच आरोपी चार्जशीटमध्ये गेले पाहिजेत. जर कोणी बाहेर राहिला तर मंत्र्याला गोट्याने हाणू, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिलाय.