लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात अद्याप तरी मोकळ्या जागेत दारु पिण्याचा परवाना देण्यात आलेला नाही. अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात असलेल्या राहुल वाईन शॉप या दुकानाचा मालक ‘एक्साईज डिपार्टमेंट’चे जे कोणी अधिकारी आहेत, त्यांचा एक तर जावई असावा किंवा ‘स्पेशल कोट्या’तून सरकारनं त्याला खुलेआम दारु विक्रीची परवानगी दिली असावी, असा कयास नगरकरांमधून सध्या लावला जात आहे.
अहिल्यानगर एमआयडीसीतल्या या राहुल वाईन शॉपमधून दारूच्या बाटल्या विकत घेऊन अनेक तळीराम निर्धास्तपणे मोकळ्या जागेतच दारु ढोसत आहेत. या परिसरातल्या रस्त्यावरुन ये – जा करणाऱ्या माता भगिनींची मात्र यामुळे प्रचंड अशी कुचंबना होत आहे. अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात राज्याचा उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज डिपार्टमेंट) आणि या विभागाचे अधिकारी सध्या ढाराढूर झोपले आहेत की काय, असादेखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या एकूण पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीरपणे विनंती करावीशी वाटते, की देवाभाऊ, अहिल्यानगरची एमआयडीसी बंद करा. खुलेआम दारु विक्रीला आणि तळीरामांना रस्त्याच्या कडेला बसून दारु पिण्याची परवानगी द्या. कारण अहिल्यानगरचं ‘एक्साईज डिपार्टमेंट’ कोमात गेलंय. अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो महिला भगिनी काम करत आहेत. मात्र या भागातल्या राहुल वाईन शॉपमधून दारु विकत घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत अनेक तळीराम अगदी बिनधास्तपणे दारु ढोसत असतात. या प्रकारामुळे महिला भगिनींची मात्र प्रचंड कुचंबणा होत आहे.
दारुबंदी करण्याची जबाबदारी ज्या खात्यावर आहे, त्या विभागाचे लोक नक्की काय करताहेत, हाच मोठा प्रश्न आहे. राहुल वाईन शॉपला जर परमीट देण्यात आलं असेल तर ते परमीट रस्त्याच्या कडेला बसून दारु विक्रीचं पिण्याचं आहे का, या वाईन शॉपला नक्की कोणत्या प्रकारचा लायसन देण्यात आलं आहे, याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
दरम्यान, एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या भरवशावर बसतात. पोलिसांनी याचा ठेका घेतला आहे का, या विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काहीच जबाबदारी नाही का, याचाच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे विचार करावा, अशी अपेक्षा अहिल्यानगर एमआयडीसीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांबद्दल व्यक्त केली जात आहे.